* ग्राहकांचे भ्रामक जाहिरातींवर बारीक लक्ष हवें *
हेंलो, म्हणताच जगातल्या कोणत्याही शहरातून प्रतिसाद मिळेल, असे असताना आपले उत्पादन ग्राहकाला जगभर कोठेही उपलब्ध व्हावं, असे कुणाला वाटणार नाही ? आणि त्यासाठीच तर आहे- उद्योग विश्वाला जोडून जाहिरातीचे आकर्षक विश्व. माल कितीही चांगला असो पण आकर्षक, परिणामकारक व सतत केलेल्या जाहिरातीशिवाय व्यवसाय होणे खरेच कठीण आहे. उत्पादनाच्या गुणवत्ते प्रमाणे, किंमतीपेक्षा, जाहिरातींसाठी प्रसारमाध्यमांची निवड, नेमकी, लक्षवेधी, भडक जाहिरात आणि रंगीबेरंगी आकर्षक वेष्टण, यांचीच किंमत अधिक असून तो बोझा ग्राहकांनाच उचलावा लागतो. उत्तम निरिक्षणशक्ती असलेल्या महत्वाकांशी बुद्धीवंतासाठी हे क्षेत्र म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखे आहे. कल्पकतेला प्रचंड वाव, व्याप्ती असलेलं हे क्षेत्र गुणवंतांच चीज करणारं आहे. विविध कलागुणांच्या द्वारे नेमका "मेसेज'ठसवला जातो आणि कमी वेळात ग्राहक संमोहित होतो, भारावला जातो. दर्जेदार उत्पादन असुनही यशाच्या वाट्यात, श्रेय द्यावे लागेल, जाहिरातीला.
"फेअरग्लोनं स्नान करा' किंवा "फेवीकॉल चा ट्रेक्टर' या सारख्या श्रेष्ठ जाहिराती सहज लक्षात राहतात पण कितीतरी ओढुनताणुन तयार केलेल्या क्लिष्ट जाहिराती नेहमीच बोअर होतात. अनेक वेळा विषय मांडतांना तो भडक, उत्तान, अश्लिल पद्धतीने मांडला जातो. घरातील वृद्ध, तरूण व लहान मुलांसोबत या जाहिराती पाहतांना मनोमन लाज वाटते आणि चेंनल बदलवले जाते. विषय सादर करतांना याचे भान ठेवावयाला हवे. समाजातील सर्व वयोगटांसाठी हे जाहिरातीचे माध्यम हाताळावयास हवे. नकळत विविध घटकांची मने आकार घेत असतात. नित्यनेमाने दाखवलं जातं ते चांगलं व सत्य असणारच हा गैरसमज दृढ होत जातो. सौंदर्य प्रसाधने, व लहान मुलांच्या विविध वस्तु, खेळणी, आहार व विशेषत: "बेबी आईल' अशा जाहिराती अतीरंजीत नसाव्या. सौंदर्य प्रसाधने वापरतांना "अलर्जी 'किंवा "हायपर सेंटीटीव्हीटी' होवू शकते याची सुचना जाहिरातीत किंवा वेष्टणांवर द्यायला हवी. उत्पादन कोणत्या घटकांपासून बनते, त्या घटकाचं धोकादायक बनण्याचं प्रमाण, याची सुचना असावी. एकदा जाहिरातीने "भारला' की ग्राहक अधीरपणे वस्तु विकत घेतो, वापरतो,पण घटक द्रव्य, औषधीमुल्य, पोषणमुल्य, अलर्जी याविषयी जागरुकता असणे आवश्यक आहे.
कोणत्याही व्यक्तिरेखेची टिंगलटवाळी , धार्मिक विधी पद्धतीवर आधारीत, नग्न दृष्यांची रेलचेल असणाऱ्या जाहिराती नकोत, आजकाल धार्मिक भावनांचे विडंबन करून जाहिरातीत प्रयोग करणे ही विकृती वाढीस लागली आहे. समाजाकडून अशा अनेक अनीष्ट कृतींचा व्यापक तीव्र निषेध व विरोध होण्याची गरज आहे. भ्रामक कल्पना सादर करून कुणीही ग्राहकाला उल्लु बनवावं, लुबाडावं या प्रवृत्तीचा "गुन्हा'या सदरात शासन स्तरावर अभ्यास व्हावा. व या कृतीला कायद्याच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. उत्पादनाची जाहिरात सादर करताना अतीरंजीत, अवास्तव आणि भ्रम उत्पन्न होईल अशी विधाने किंवा दृष्ये असल्यास हरकत घेतली जावी. सभ्यता आणि शिष्टतेच्या कल्पनेस बाधा येईल व समाजमनाची विकृती वाढेल अशा भ्रामक जाहिरातींवर बारीक लक्ष हवे. ग्राहकांमधे जागृतीची फारच गरज आहे.लुटारू प्रवृत्तीमुळे ग्राहक जागोजागी नाडवला जातोय ,सावध होणे गरजेचे आहे .
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
उजळते क्षितीज [मराठी लेख संग्रह -२००७]
www.mazyasamvedana.com