* कायदा असावा इच्छामरणाचा ! *
इच्छामरणाचा कायदा असावा की नसावा याबाबत वर्षानुवर्षे चर्चा सुरू आहे. वास्तविक जीवन व मृत्यू दोन्ही विषय सर्वस्वी निसर्गाच्या नियमाने सांभाळले जातात. सुखदु:खाच्या सर्व पातळी वरून प्रवास करावाच लागतो, पण--- एखाद्याच्या नशीबी पराकोटीचे दु:ख, यातना, पराधीनता, असहाह्यता आणि मुख्यत्वे हतबलता निर्माण होते की संपूर्ण समाजघटकांना त्या व्यक्तीविषयी हळ हळ , चिंता, करूणा उत्पन्न होते. अत्याधुनिक वैद्यक शास्त्राच्या मर्यादा संपतात आणि वर्षामागुन वर्ष लोटतात, केवळ प्राण आहे म्हणून त्याला जीवंत आहे असे म्हणायचे, परंतु त्या संवेदना शुन्य जीवाच्या यातना, तडफड, असह्य असा बेभानपणा असहाय्य पणे बघत बसण्याशिवाय काहीही करता येत नाही.
केवळ वृद्धत्वामुळे च अशी परिस्थिती असेल असे नाहीच. विविध वयोगटातील कितीतरी व्यक्ती आज अशा अवस्थेत केवळ प्राण आहे म्हणून जीवंत आहेत, असे म्हणायचे. अशा व्यक्तींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीसाठी इच्छामरणाचा (दयामरणाचा) प्रस्ताव मांडला तर त्यात नवल नाही. प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा वर्षानुवर्षे विविध प्रकारे छळ करून त्या जीवनाला मुक्त करीत नाही, दयावान होऊन मरण देत नाही. केवढी ही जीवनमृत्युची शोकांतीका ! अशावेळी "समाजमन' विदिर्ण होते आणि दयामरणाची मागणी कायद्याच्या तज्ञांद्वारे केली जाते.
इच्छामरणाचा कायदा केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, असा युक्तीवाद केला जातो. मुख्यत्वे इस्टेटीच्या लोभापाई कायद्याच्या परवानगीने रुग्णाचा काटा काढला जाईल असा धोका वाटतो, परंतु हे विधान प्रत्येकच कायद्याला लागू आहे. कायदे असताना त्यात पळवाटा शोधून गुन्हे घडतात. इतरत्र काही देशांमध्ये इच्छामरणाचा कायदा अस्तित्वात आहे. तेथील वास्तविक कसे आहे? या कायद्याची तेथील न्यायपालीका कशाप्रकारे अंमलबजावणी करते याचा सखोल अभ्यास भारतीय तज्ञ करीत असतीलच. त्याप्रमाणे काही निकष लावता येतील .
सर्वप्रथम आत्महत्या हा गुन्हा समजण्यात येऊ नये अशी मानसीकता तयार होणे गरजेचे आहे. तसेच महत्वाचे म्हणजे इतर उपचार पद्धतीच्या तज्ञांचे मत इच्छामरणाच्या रुग्णासाठी विचारात घ्यावे हा आग्रह धरावा. आणि विविध उपचार पद्धतीने सुद्धा रुग्ण बरा होणार नसल्यासच अशा रुग्णासाठी सर्व संमतीने कायदा असावा. कायद्याचा कुणाकडूनही गैरवापर होणार नाही, अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. बऱ्याच वेळा गरीबी दारिद्र्य , शासकीय अत्याचार, मानसिक रोग, व्यसने, वृद्धत्व अशा कारणांनी इच्छामरणाची मागणी केली जाते ती नक्कीच मान्य होणार नाही. या कायद्यासाठी स्पष्ट निकष आवश्यक आहे. मात्र अत्यंतिक दयाळू बुद्धीने लवकरच इच्छामरणाचा कायदा असावा, या विचारात सुद्धा तिव्र दु:खच आहे.
ुुु सुहास सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
www.mazyasamvedana.com
No comments:
Post a Comment