Thursday, December 20, 2012

*आतंकवाद आणि भारताची ओळख*


*आतंकवाद आणि भारताची ओळख*

    आमच्‌या देशातील  कोणतेही एखादं मोठं शहर, जागा बाजारपेठेची, अत्यंत गर्दी ची, वेळ  शक्यतो सायंकाळ ची, एका पाठोपाठ एक सिरिअल  बॉम्ब ब्लास्ट होतात, कितीतरी जीव अचानक मृत्युमुखी पडतात, शेकडो लोक  जखमी होतात, पांगळे  होतात.  आनंदी जीवनाचा रंग क्षणात विस्कटून जातो, जाणवतो, आणि उरतो तो केवळ रक्ताचा लाल  रंग.  वर्षानुवर्ष निरपराध भारतीयांचे रक्ताचे पाट वाहताहेत, मुडदे पडताहेत.  का? का? नेमकं कशासाठी? कोण घडवून आणतो हा विध्वंस? देशात कानाकोपऱ्यात विनासायास या विध्वंसक कारवाया आखल्या जातात व चारही दिशांतील  कोणत्याही शहरात स्फोट घडवले  जातात.  कोट्‌यावधी नागरीकांना कायम दहशतीत जगायला  भाग पाडणारी ही यंत्रणा एवढी सक्षम कशी बनली ? नित्यनेमाने विध्वंसक घटना घडवून आणून आतंकवादी संघटना निर्ढावल्या आहेत.  त्यातही कहर म्हणजे अशा स्फोटांची जबाबदारी घ्यायला  या मस्तवाल  संघटना बेधडक पुढे येतात. 
    विविध ठिकाणी घडलेल्या या सगळ्या  घटना परराष्ट्रतील  आतंकवादी संघटनांनी घडवल्या नसून काही वेळा   भारतातल्या संघटनेने हे घृणित कार्य केले  आहे.  खुद्द प्रशासन व विविध प्रसारमाध्यमे ही गोष्ट  मान्य करताहेत.  पोलिसांची उपस्थिती असताना हजारो नागरीकांच्या अवतीभवती हे आतंकवादी सराईतपणे वावरताहेत.  विविध तèहेने विविध प्रकारे स्फोटके सहजपणे पेरली  जातात,  तेव्ह्ढ्याच सहजतेने त्या जागेवरून त्वरीत दूर जातात आणि काही मिनिटांच्‌या अंतराने ते भयनाट्य  सुरू होते.  अनेक वेळा  मानवी बाँम्बचा देखील  वापर झाला  आहे.  भारतीय असलेल्या आतंकवादी संघटनेला  स्फोटके, पैसा, तंत्रज्ञान व शिक्षण कोण देतं? आमच्या देशातील  सर्वदूर पसरलेला  भ्रष्टाचार  आतंकवादी संघटनांच्या कारस्थानाला  कळत नकळत हातभार लावतो का? त्या शिवाय या अतिरेक्यांचा सहज वावर कसा शक्य आहे? अतिरेक्यांचं कार्य पद्धतीसाठी असलेल्या यंत्रणेचं जाळ  किती सक्षम आहे ही गोष्ट  वारंवार सिद्ध होते आहे, परंतु देशाची सुरक्षा यंत्रणा अजुनही अतिरेक्यांचा कायम बिमोड करू शकली  नाही.  ज्ञात असलेल्या अतिरेकी संघटना कायमच्या नष्ट  का करता येत नाहीत?  यासाठी विशेष दहशतवाद विरोधी कायदा का तयार करता येऊ नये?
    आमच्या भूमीवर आतंकवादी संघटना फोफावत असतील , प्रबळ  होत असतील  तर जगाच्या नजरेत भविष्यातील  भारताची कशी प्रतिमा तयार होईल ? स्वत:च्या नागरीकांच्या प्राणाचे रक्षण ही शासन व्यवस्था करू शकत नसेल  तर आजचा भारत बलवान आहे का? देशाच्या विकासावर या विचारांचा परिणाम कसा होईल ? देशांतर्गत आतंकवादी शत्रू समोर आणून त्यांना कठोर शिक्षा होणे, या प्रश्नाला  अग्रक्रम देण्याची गरज आहे. "भ्रष्टाचाचारादवारे आतंकवादाला  खतपाणी घालणारं राष्ट्र ' किंवा "आतंकवादामुळे  हतबल  झालेलं  राष्ट्र  अशी आमची ओळख आम्हाला  नको आहे.
सुहास सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २ ० १ २ ]
www.facebook.com/mazyasamwedana


                        ुुु

No comments: