Sunday, February 28, 2016

गाव तेथे तळे



प्रती ,
*ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज*
विषय :प्रत्येक गावासाठी एक तलाव तयार करावा.
सन्माननीय महोदय ,
            “गाव तेथे तळे”[जलयुक्त शिवार] ही संकल्पना सरकारी पातळीवर राबविल्यास प्रत्येक गावाला पडीक जमिनीवर कमीतकमी २ एकराचा तलाव असणे अनिवार्य ठरेल .ठिकठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध राहील.पाणी जमिनीत जिरेल व गावातील विहिरींना पाणी पाझरेल.अनेक तांत्रिक प्रश्नांचा मागोवा घेऊन सर्वेक्षण करता येईल .ज्याप्रमाणे आपल्या बँकेच्या खात्यात प्रथम पैसे जमा करावे लागतात नंतरच त्यातील थोडे काढता येतात,तसे जमिनीत प्रथम पाणी मुरवावे आणि नंतरच त्याचा उपसा करावा ,असे वाटते .
           प्रत्येक तलावाभोवती त्या गावातर्फे “ स्मृतिवनाची “ कल्पना रुजविल्यास तलावाभोवती प्रदेशानुरूप वृक्षांची रोपे लाऊन आजपर्यंत पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे तो काही प्रमाणात भरून काढता येईल .पुढील काही वर्षे तलाव व त्याभोवतीची “स्मृतीवने” यांचे रक्षण केल्यास देशाचे “निसर्ग
चित्र “सुंदर दिसेल.अनेक कारणांनी झालेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट होत चाललेले वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब, चिंच, साग, कवीठ, बेल ,आवळा, बहावा, अर्जुनवृक्ष हे पुन्हा लावले पाहिजेत .
          असंख्य कल्पना मांडतांना ज्याप्रमाणे जगभरातील” सेलिब्रिटीज “च्या माध्यमातून मांडल्या जातात ,लोकप्रिय व्यक्तींच्या प्रभावाचा वापर केला  जातो ,त्याप्रमाणे प्रसिध्द व्यक्तींच्या वलयाचा लाभ या कार्यासाठी व्हावा .सर्व सेवाभावी संस्था व धनवानांनी “ पृथ्वीच्या अस्तित्वाच्या या सकारात्मक कार्या साठी” परमनंट प्रोजेक्ट तयार करावेत .गाव दत्तक योजना राबवावी .सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक दुर्लक्षित तलावांसाठी सुद्धा हा कार्यक्रम राबवता येईल .ग्रामसभेत या विषयावर चर्चा होऊन ठराव करून हे कार्य सुरु होऊ शकते ,जे पुढील अनेक शतकांसाठी सकारात्मक कार्य म्हणून देशाच्या इतिहासात नोंद होईल .**गावतलाव + स्मृतीवने = पर्यावरण संवर्धन**हे सूत्र यशस्वी पणे वापरणे आवश्यक आहे .पाऊस पडत असतांनाच पाणी संवर्धनाचे कार्य होऊ शकते ,अन्यथा पाणी टंचाई अटळ आहे .
        कृपया माझ्या सूचनेचा विचार करावा .धन्यवाद .    आपला नम्र
सुहास सोहोनी,सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी अमरावती [महाराष्ट्र ] मोबा-९४०५३४९३५४
 

Thursday, February 18, 2016

* असंतुष्ट आणि भ्रष्टाचार्यांच्या शोधात असतात आतंकवादी *



* असंतुष्ट आणि भ्रष्टाचार्यांच्या शोधात असतात आतंकवादी *
           इतिहास साक्ष आहे कि जेंव्हा जेंव्हा सकारात्मक विचार करणारे सज्जन असंघटीत होऊन निस्तेज,निराश होतात,तेंव्हा दुष्ट प्रवृत्ती सोकावतात ,अत्याचारी प्रबळ होतात आणि निरपराध समाजाची दुर्दशा होते .आतंकवादी घटनांमुळे देशाच्या शांतता व विकास प्रक्रियेस खिळ बसते .समाजमन विदीर्ण होते ,प्रक्षुब्ध होते .नेमकी त्याचवेळी राजकारणाची खेळी रंगते,आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी सुरु होते .विविध वृत्त वाहिन्या अत्यंत तत्परतेने देशवासियांना माहितीचा ओघ पुरवतात.काही चेनल्स तर संबंधित घटनेला जबाबदार आतंकवाद्यांची नावे,पत्ता,फोटो सुद्धा दाखवून देशाच्या पोलीस यंत्रणेपेक्षा सरस असल्याचे पटवून देतात .फक्त हे गुन्हेगार सापडत नसतात कारण हे भारताच्या सीमेपलीकडून आलेले असतात आणि घटनेला ‘अंजाम’ देऊन परत सीमेपार गेले असावेत – बहुतेक ----
           देशांतर्गत समस्या पुढे करून अनेक उपद्रवी संघटना विविध ठिकाणी हिंसक कारवाया करून दहशत निर्माण करतात ,ही एक तीव्र डोकेदुखी असतांनाच आंतरराष्ट्रीय आतंकवादाचे प्रमाण भारतात फार वाढलं आहे .सीमेपलीकडे असलेली आतंकवादी संघटनेची प्रशिक्षण केंद्रे ,त्यांना मदत करणारी सरकारे यांचा उल्लेख आणि निषेध करूनच आमचं सरकार थांबत .सुसज्ज सैन्य असतांना आतंकवादी असे कसे येऊ शकतात,देशभर निर्धोक संचार कसा करू शकतात ?यांना भाड्याने घरे कशी मिळतात ?हवं तेव्हा व हवा तितका काळ ते इथे राहू कसे शकतात ?कोण नेहमी यांना मदत करत ?अफाट शस्त्रसाठा ,स्फोटके नित्य नेमाने कशी आणली जातात ?यांना भारताची प्रगती आणि शांतता बघवत नाही .आतंकवादी व्यक्ती भारतात असतांना त्यांना कळत नकळत मदत करणारे भ्रष्टाचारी भारतीय नागरिकाच आहेत ,तर मग काय स्वार्थ आहे या नागरिकांचा ?यांच्या मुळे देशाची कधीही न भरून निघणारी हानी होते हे कधी कळणार आमच्या भ्रष्टाचारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी कारवायांना समर्थन देणाऱ्या असंतुष्ट नेते ,सेलिब्रिटी व असंतुष्ट समाजघटकांना ? या नतद्रष्ट लोकांमुळे भारतीय संरक्षण यंत्रणा आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आपल्या ‘ लक्ष्यापर्यंत ‘ हे हल्लेखोर पोहचतात, तोपर्यंत अख्खा देश झोपलेला असतो का?
           सीमेच्या आत देश रक्षणासाठी ‘दक्षता पथक’/[,’देशप्रेमी प्रहरी’] तयार करण्याची गरज आहे .विविध तपास यंत्रणा व पोलीस यांच्या सोबत जबाबदारीने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर हवी .आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या ,समर्थन देणाऱ्या छुप्या आश्रयदात्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावयास हवी ,ती सुद्धा लवकर .आपल्याकडे न्यायालयाचे निकाल विलंबाने लागतात .अतिरेकी मात्र भरमसाठ पैसा पेरून हवे ते मिळवतात, हे थांबायला हवे .अद्ययावत गुप्तचर यंत्रणा व दक्ष नागरिकांच्या सहाय्याने प्रत्येक कट उध्वस्त  करता यायला हवा. अतिरेकी कारवाया म्हणजे अघोषित युद्धच समजायला हवे.राजकारण्या सकट कुणीही वेगवेगळी विधाने करून केवळ अंदाज जाहीर करू नये किंवा परिस्थिती व घटनेचे समर्थन करू नये .आपल्या देशात परस्पर विरोधी राजकीय,मानसिक व वैचारिक असे टोकाचे मतभेद आहेत.अयोग्य बेताल वक्तव्ये केली जातात ज्यामुळे जनतेत वैचारिक मतभेद होऊन लोकं हिंसक होतात.आतंकवाद्यांचे आयतेच फावते .प्रत्यक्ष युद्ध करण्याची ताकत नसलेले,आतंक वादाच्या भ्याड हल्ल्याच्या मार्गाने त्रास देणारा दुश्मन जास्त धोकादायक असतो .  व्यसने आणि भ्रष्टाचाराचे बीज रोऊन दहशतवादी भारताला खिळखिळे करू इच्छितात तेंव्हा भारतीयांनी संघटित होऊन सुरक्षेला अग्रक्रम देणे आवश्यक आहे .सर्व भेदाभेद विसरून प्रत्येक भारतीयाने दहशतवादी विचार संपवण्यासाठी संघटित होऊन सतर्क राहणे जरुरी आहे , आणि *फक्त विरोधासाठी विरोध करणे थांबवावे*
सुहास सोहोनी
लेख संग्रह [घे उंच भरारी २०१६]
www.suhassohoni.blogspot.com   

Wednesday, February 17, 2016

सुसंस्काराच दान -एक अग्निहोत्र



                                         *  सुसंस्काराच दान -एक अग्निहोत्र *
      संत गुलाबराव महाराजांच्या नामस्मरणाने पावन झालेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथिल “भक्तीधाम”समोरून जात असतांना मी अचानक थांबलो .मंदिराच्या सभामंडपात किमान दोनशे पेक्षा जास्त मुले अतिशय शिस्तीत बसली होती,आणि एकास्वरात त्यांच्याकडून संतवचने म्हणवून घेतली जात होती.मंत्रमुग्ध करणारे ते वातावरण होते .सृजन व गुणवान समाज निर्माण करण्याच स्वप्न बघणाऱ्यांच तेथे संस्कार शिबीर होत.लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा असा संतस्पर्श,संतसंगत व संतविचार ज्या ज्या व्यक्तीला लाभले ती व्यक्ती सद्वर्तनाच्या दिशेने वाटचाल करेल हे निश्चित .संस्कार शिबीर- तेही संतांच्या तपोभूमीत हाच मुळात ‘अमृत योग ‘आहे .सत्व गुणांनी युक्त असा शक्तिशाली माणूस घडवून समाजाला देणे ,हाच उद्देश आहे संताच्या तपोभूमीचा आणि मंदिराचा .
      मुळात हे सुसंस्काराच दान त्या भावी नागरिकाला त्याच्या घरात दिले गेले पाहिजे .प्रत्येक पालकाचे हे आद्य कर्तव्य आहे .मंदिरच पावित्र्य आपण जपतो, पण स्वतःच्या घराचे काय ?सुसंस्कार व पावित्र्य यात गरीब, श्रीमंत,जात,धर्म यांचा काय संबंध ?दगड विटांनी बांधलेल्या घरांत वातावरण शुद्ध ,प्रसन्न आणि प्रत्येकाचा आदर करणार हवं.एखाद सुंदर निरागस शुद्धतेच प्रतिक असलेलं,पूर्ण उमललेलं पुष्प जसं आसमंतात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत ,तसे सात्विक विचार प्रत्येक घरातून बाहेर यावेत हि वास्तविक अपेक्षा आहे .चांगले कार्य कधीही सुरु करावे .प्रत्येकाने आपल्या मनात आणि घरांत डोकावून पाहिले कि नक्की कुठे डागडुजी करायची ते उमजेल .आपल्या घराला ,आपल्या मुलांना आणि समाजाला आज गरज आहे ‘ समाज घडवणार्यांची ’.ज्योत कायम पेटती ठेवण्यासाठी जसे नेहमी सतर्क राहावे लागते,तसे आहे सुसंस्काराचे .एखाद्या पवित्र मंदिराकडे जसे सगळे आदराने पाहतात तसें आपल्या घराकडे समाजाने आदराने बघावे असे प्रत्येकाला वाटले तर .........
सुहास सोहोनी
लेख संग्रह [वर्तुळाचे टोक -२००५ ]

Tuesday, February 2, 2016

* वीजटंचाईला उत्तर –सौर उर्जा उद्योग ,पण केंव्हा ?*


 * वीजटंचाईला उत्तर –सौर उर्जा उद्योग ,पण केंव्हा ?*
        सौर उर्जेचा उपयोग आपण मुळीच करत नाही. उर्जेचा प्रखर स्त्रोत डोक्यावर तळपत असतांना सौर उर्जेचा वापर का नाही होत ? ही उर्जा शाश्वत ,अनंत आहे ,अविनाशी आहे तरीही दैनंदिन कार्यासाठी हि उर्जा आपण वापरत नाही .आपण भूगर्भातील कोळसा, पाणी, पेट्रोल ,वायू किती नष्ट करणार? काही क्रांतिकारक बदल होण्याची गरज आहे .हा प्रकल्प आत्यंतिक महाग असला तरी त्यात देश हित आहे व देशाच्या विकासा हेतू अत्यावश्यक आहे .तल्लख बुद्धीमत्तेचे आमचे शास्त्रज्ञ,प्रदूषण मुक्त इंधन देणाऱ्या व सहस्त्र दिशांनी अविरत झिरपणार्या या सूर्य किरणांना आपल्या ओंजळीत बंदिस्त नक्कीच करतील .
        विजेचा वापर हा मुख्यत्वे १] घरगुती २] उद्योग,व्यवसाय ३]शेती ४]पथदिवे ह्या चार प्रकारे होत असतो.यापैकी उद्योग व्यवसाय व शेती यांना प्राधान्य द्यायला हवे,यात दुमत नसावे.प्रत्येक शहरातील व जिल्ह्यातील पथदिवे संपूर्णपणे सौर उर्जेवर कटाक्षाने चालवावे .यासाठी जिल्हावार सौर उर्जा केंद्र उभारायला हवे .या पद्धतीत संशोधन व उद्योगाला भरपूर वाव आहे .वाचलेली वीज शेती व उद्योगाकडे वळवता येईल .कधीही खंडित न होणारी वीज आम्हाला मिळावी अशी रास्त मागणी ग्राहकांची असणे साहजिकच आहे .नवीन बहुमजली बांधकामांच्या वेळीच सौर्य उर्जा संयंत्र बसवण्याची अट असावी .कर्ज उपलब्ध आहेच .
         शासनाच्या कागदावर असणाऱ्या विविध योजना कार्यान्वित व्हाव्यात .गरज आहे योग्य संशोधनाची ,सकारात्मक खंबीर प्रयत्नांची .सौर उर्जा उद्योगात रोजगाराची फार मोठी संधी आहे .हा उद्योग देशासाठी क्रांती पर्व ठरू शकतो .शासन आणि जनतेची मानसिकता बदलण्याची गरज आहे .केवळ राजकारण करून पक्षीय स्वार्थ पदरी पाडून घेण्यापेक्षा काही राष्ट्रीय कार्य दीर्घ मुदतीसाठी करण्याची आवश्यकता असते ,ज्यात देशाचे भले व्हावे.
सुहास सोहोनी
लेख संग्रह –उजळते क्षितिज[२००७ ]मोबा -९४०५३४९३५४