Thursday, December 20, 2012

* खाकीचा रंग काळा होतोय *

    *   खाकीचा रंग काळा  होतोय  *
--------------------------------------------
    पोलीस दलात नोकरी करणारे जवान म्हणजे नक्की कोण असतात? सर्व प्रथम ते देशाचे नागरीक असतात त्याचबरोबर ते कुणाचे तरी भाऊ, बहिण, आई, बाप असतात.  मुळात सामान्य जनतेचा एक घटक असलेला , कुणीतरी, केवi नोकरीच्या निमित्याने पेशाने पोलीस बनतो.  शांततेने जगू इछिणाऱ्या  सामान्य माणसाचे रक्षण करणे, गुन्हेगारांवर जरब बसवणे, ताब्यात घेवून त्यांना शिक्षा होण्यासाठी न्यायसंस्थेला  मदत करणे, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी तैनात राहणे, बंदोबस्त सांभाळणे अशा विविध कार्यात पोलीस नेहमी व्यस्त असतात.  कितीतरी वेळा  दंगल , संप, बंद अशा प्रसंगी हिंसक जमावाला  सामोरे जाताना एका विचित्र मानसिक तणावाखाली  असणं अगदी साहजिक आहे.  पोलीसांना सुद्धा कुटुंब आहे, मुलं बाळ  आहेत, समस्या आहेत, महागाईसुद्धा आहे.  वरिष्ठांचा चा धाक आहे, कार्यालयीन लालफीतशाही, अव्यवस्थेचा ताण  पोलीसांना सुद्धा सहन करावाच लागतो.
    पोलीस जनतेचे मित्र असतात, लोकांनी सुद्धा पोलीसांना त्यांच्या कामात मदत करावी असे विचार वेळो वेळी  मांडले  जातात.  जनतेच्या रक्षणासाठी सदैव तैनात असणारा हा एक घटक आहे.  माणसाचे सगळेच गुणदोष पोलिसांमध्ये असणारच,  वेळो वेळी  ते सिद्धही होत असते.  गुन्हेगार असलेल्या पोलीसांना शिक्षा झालेली  आपण नेहमीच बघतो, पण तरीही कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा हा समाजघटक आहे, आणि तसा तो असलाच पाहिजे.  हा एक व्यवस्थेचाच भाग आहे.  जोपर्यंत गावात, शहरांत शांतता आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे पण ज्याक्षणी जमाव हिंसक बनतो, बसेस पेटवल्या जातात, वाहनांची तोडफोड होते, दुकानांना , घरांना आगी लावल्या जातात, हिंसक बनलेला  जमाव परस्परांचे मुडदे पाडतो, लुटालुट होते, स्त्रीयांची अब्रू लुटली  जाते अशावेळी  क्षणात चित्र पालटते.  कायदा, सुव्यवस्था, शांततेसाठी तोच पोलीस सज्ज होवून त्यांची फौज तैनात होते.
    जमाव हिसंक का होतो? रस्त्यावर उतरलेले  लोकं आगी का लावतात? लोकांना भडकाऊ भाषणांनी कोण भडकावतं? परिस्थिती चिघळे पर्यंत वर्षानुवर्षे शब्‌दांच्या ठिणग्या कोण फेकतं? लोकांना एकमेकांविरूद्ध चिथावून शस्त्र कोण पुरवतं? प्रश्न राजकीय असो भावनीक असो की सामाजीक, ती समस्या कायमची कधी सोडवायचीच नाही, पार गुंता करून टाकायचा.  मात्र त्या हिंसक परिस्थितीत जमावाला  थोपवायला  असतात पोलिसांचे ताफे.  जनतेचा रोष निघतो सर्वप्रथम पोलिसांवर.  त्यानंतर नाट्य घडते, त्यात जमावावर पाण्याचा मारा, अश्रुधूर, लाठीचार्ज आणि दुर्दैवी गोळीबार.  लुटालुट, तोडफोड करणाऱ्या  हिंसक जमावाला  दिसतो तो अडवणारा खाकी रंग.  रोषाला  बळी  पडतो तो खाकीधारी.  व्यवस्थेकडून जनतेवर अन्याय, अत्याचार होतो.  भाषणबाजी आणि माफीया राज मुळे  जनता त्रस्त होते.  राजकीय खेळीमुळे  जनतेला  प्रक्षुब्ध केले  जाते.  शांततेचा संप असला  तरी समाजकंटकाद्वारे वातावरण युद्धखोर बनवले  जाते पण संपूर्ण भार मात्र पोलीस यंत्रणेवर पडतो.  आदेशाच पालन करताना आणि जमाव काबूत येत नसल्याने जिद्दीला  पेटलेला  खाकीधारी, भान हरपलेला  आमचा पोलीस दादा हातात शस्त्र घेवून काय करून बसेल  याचा अंदाज नाही बांधता येत.  डोक्‌यात गेलेला  राग समोर सापडेल  त्याच्यावर बरसतो.  पोलिसी अत्याचाराच्या कहाण्या जन्म घेतात.  समस्याग्रस्त जनता विरोध प्रदर्शत करते आणि शेवट मात्र पोलिसी अत्याचारात होतो.  जखमी तर पोलीसही होतात.  संयम कुणी पाळायचा हा सल्ला  देणे सोपं आहे.  जनतेला  भुलावणाऱ्यानी संयम पाळावा तसा पोलिसांनी सुद्धा संयम पाळायला  हवा, मात्र काही दुर्दैवी  घटनांमुळे  खाकीचा रंग काळा  होतोय.
              ुुु  सुहास  सोहोनी
                       ९४०५३४९३५४
                क्षण  वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
                  www.suhassohoni.blogspot.com
                  www.mazyasamvedana.com

No comments: