* वाटमारीला उत्तर - दक्षता पथके *
ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो , किंवा वर्षानुवर्षे राहात आहोत तेथे दिवसारात्री कधीही निर्धोकपणे आपल्याला वावरता यावे अशी परिस्थिती असायला हवी पण वास्तवात अशी परिस्थिती नसल्याचं सतत जाणवतं. शुकशुकाट असलेल्या रस्त्यांच्या वळणांवर वाटमारीचे,महिलांवरील अत्याचाराचे प्रकार कायम घडताहेत. सुजाण नागरीकांच्या चांगल्या शहरासाठी अशा घटना म्हणजे एका वेगळ्या धोक्याची सुरवात आहे. अगदी निर्ढावल्याप्रमाणे हे प्रकार शहराबाहेर आणि मध्यवस्तीत सुद्धा घडत आहेत. का वाढते आहे ही गुन्हेगारी प्रवृत्ती? बेरोजगारी हे केवळ एकच कारण आहे काय ? वाटमारी हाच व्यवसाय होऊ पाहतोय, असे तर नाही?
शहरांच्या वाढत्या समस्या आणि आकार या गोष्टी पोलिस यंत्रणेला कायम व्यस्त ठेवत असतात आणि एकांतात सापडलेला वाटसरू हे वाटमारी करणाऱ्याचं सहज सावज ठरत. गुन्हेगार हे नेहमी मुठभर असतात पण निश्क्रीय नागरीक असल्यामुळेच त्यांचं फावतं. वाटमारीला बळी ठरलेल्या बद्दल हळ हळ व्यक्त करायची, आपण काय करू शकतो? हे पोलिसांचे काम आहे. त्यांनी बंदोबस्त चोख ठेवावा, अशा चर्चा करून आपापल्या कामाला लागावे असे हे आजचे समाजमनाचे चित्र आहे. या विचारसरणीत बदल करण्याची भविष्यात गरज आहे. पोलिस यंत्रणेवर ठपका ठेवण्यापेक्षा प्रत्येक वार्ड किंवा कॉलनी निहाय, युवकांचे, ज्येष्ठांचे दक्षता पथक उभारण्याची गरज आहे. शहरभर दक्षता पथकांचे जाळे उभारून आपसात समन्वय असावा. धोक्याच्या जागांवर कायम नजर असावी. तज्ञ पोलिस अधिकाऱ्याद्वारे या पथकांना नित्य मार्गदर्शन दिले जावे. चर्चासत्रे आयोजित केली जावीत. दक्षता पथकातील सदस्यांना ओळखपत्र दिले जावे. संपुर्ण रात्र शहरावर, रस्त्यावर, नजर राहील अशा प्रकारे सदस्यांना वेळा ठरवून द्याव्यात. विविध गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा दक्षता पथकांचा उपयोग होईलच, पण अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती च्या काळात या पथकाचा विशेष उपयोग होईल . अपघातग्रस्तांना त्वरीत मदत मिळेल , रक्त उपलब्ध होईल . नागरीकांना सुरक्षितता मिळेल .
सूर्य प्रकाशाला जसे पिशाच्य घाबरतात तसे नागरीकांच्या एकीला गुन्हेगार घाबतात. आपल्या शहरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या युवकांनो एकत्र या, दक्षता पथकात सामील व्हा, धैर्य आणि संयम या दोन गुणांची तुमच्यात आवश्यकता आहे. स्वत: कायदा हातात घेऊ नका. कायद्याला मदत करा. सुजाण नागरीकांच्या चांगल्या शहराला सुरक्षा देण्यासाठी एकत्र होण्याची गरज आहे. सर्व भेदाभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. शहरभर दक्षता पथकांचं जाऴ सज्ज करा मग बघू कोण मंगळ सुत्र हिसकावण्याची हिंमत करतो आणि कोण कुणाला रस्त्यात अडवून लुटतो? छेडखानी करतो ? लोकसंख्यावाढ व बेरोजगारी या कारणाने आज गुन्हेगारी वाढत असली तरी गुन्हेगारीकडे वळलेल्यांच्या मनात धाक निर्माण करणे हे फारच गरजेचे आहे.
ुुु सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
www.mazyasamvedana.com
No comments:
Post a Comment