Thursday, December 20, 2012

अन्न मदत नको, उद्योग उभारा-रोजगार द्या


*  अन्न मदत नको, उद्योग उभारा-रोजगार द्या   *

    टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठीच माणूस दिवसरात्र राबराब राबतो.  आपले  मूळ गाव सोडून आप्तेष्टा पासून दूर कुठेही नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो.  स्थलांतर करतो, जुळवून घेतो, स्पर्धा करतो व यशाची एक एक पायरी चढत जातो,  म्हणजे प्रत्येकाला  आपले  अन्न कष्ट  करूनच मिळवावे लागते.  अन्नासाठी दाहीदिशा आम्हा फिरविसी जगदिशा हेच खरे आहे. पण जर केवळ  गरीबीच्या नावाखाली  वर्षानुवर्षे मोफत धान्य मिळत गेलं  तर तो संपूर्ण समाजघटक अन्न मिळविण्यासाठी कुठलेही कष्ट का करेल ? फुकट किंवा दोन रूपये दराने धान्य मिळत असेल  तर ही जनता ऐतखाऊ होणारच.  कुशल  कामगार फारसे काम करणार नाही.  मजूर मजूरी करणार नाही.  पैसे, कपडे, औषधे, छोट्या  मोठ्या  गरजेच्या वस्तू, चैनीच्या गोष्टी  सुद्धा फुकटात कशा मिळतील  या शोधातच प्रत्येकजण राहील , म्हणजेच निष्क्रीय बनेल .  रिकामं डोक   हे नेहमीच सैतानाचं घर असतं त्यातच व्यसनांची पुर्तता करण्यासाठी चोख व्यवस्था प्रत्येक गावात शासनमान्यच आहे.
    भूकंप, महापूर किंवा विविध आपत्तीकाळात अन्नधान्याची मदत अत्यावश्यक आहेच पण इतरवेळी  हा अयोग्य खेळ  आहे.  असा खेळ  मांडून देशाचा विकास साधला  जाईल ? त्यापेक्षा गावागावांत विविध कुटीर उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन द्या.  प्रत्येक हाताला  काम कसे मिळेल   याची काळजी घेऊन कामाचे योग्य दाम द्या आणि प्रत्येकाचे अन्न त्यालाच खरेदी करू द्या.  गोदामात धान्य सडत ठेवण्यापेक्षा संपूर्ण देशातच महागाई कमी व्हावयास हवी.  प्रत्येकालाच अन्नधान्य सकस व स्वस्त मिळू  द्या.  अनियंत्रीत लोकसंख्या हेच प्रत्येक समस्येच मूळ  आहे.  गरीब व आदिवासीबहूल  भागात परिवार नियोजन कार्यक्रमाचा बट्ट्या बोळ  झाला  आहे, त्यातच कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे, म्हणजेच भविष्यातील  देशाचे आधारस्तंभ मजबूत आहेत?
    गावागावात स्थानिक उपलब्धतेप्रमाणे असणाऱ्या  कच्च्या मालावर आधारीत छोटे उद्योग उभे करण्याची गरज आहे, त्यासाठी बचतगटांचे कार्य मोलाचे ठरणार आहे.  जिल्हास्तरावर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारखे प्रकल्प हवेत त्याद्वारे कमीतकमी पथदिवे तरी लागतील  आणि ऊर्जा बचत साधेल .  इतस्तत: उडत असलेल्या प्लास्टिकच्या थैल्या पर्यावरणासाठी संकट आहेत.  त्यासाठी रिसायकलिंग प्लांट  जिल्हास्तरावर व्हावेत.  ज्या प्रदेशात कापूस पिकतो तेथे हातमाग का नसावेत? उत्पन्नाप्रमाणे त्या त्या प्रदेशात गृहउद्योगाला  प्रोत्साहन दिले  गेले  पाहिजे.  मोठ्या  प्रकल्पांना धरून अनेक लहान उद्योग यशस्वीरित्या चालत असतात, मात्र शासनाने आणि खासगी उद्योगपतींनी सकारात्मक पाऊल  टाकणे महत्वाचे आहे.
 फुकटात वाटप करून जनतेला  निश्क्रिय, आळशी बनवण्याऐवजी छोट्या मोठ्या  उद्योगांची उभारणी करून प्रत्येकाला  रोजगार उपलब्ध करून दिला  तर जनता सन्मानाच जीणं जगेल , उद्योग व उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील , पर्यायाने देश प्रगती करेल .  म्हणजेच विकास साधेल , म्हणून फुकट अन्न मदत नसावी, त्याऐवजी उद्योगांची उभारणी करा, म्हणजेच रोजगार द्या.
                        ुुु  सुहास सोहोनी
                               ९४०५३४९३५४
                            क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                            www.mazyasamvedana.com

No comments: