* आरोग्ययंत्रणा सक्षम कशी व कधी होणार? *
शासनाची आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम होत आहे असे चित्र सध्यातरी दिसत आहे. जिल्हा तसेच ग्रामीण हॉस्पिटल्स मध्ये विविध स्तरांवर पदे रिक्त आहेत, आणि ती वर्षानुवर्षे रिक्त असतात. वेगवेगळ्या विभागात तज्ञ डॉक्टर सेवेत नसतात. ती पदे का भरली जात नाहीत? नेहमी औषधांचा तुटवडा का असतो? अद्ययावत यंत्रे, उपकरणे खरेदी केली जातात पण बऱ्याचवेळा ती नादुरुस्त आहेत असे सांगितले जाते. जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची ज्या आरोग्य खात्याची जबाबदारी आहे ते आरोग्य खातच जर आजारी असेल तर ग्रामीण जनतेला आजारपणात कोण सावरणार?
निसर्ग फारच लहरी झाला असून वर्षभर विविध साथीचे आजार होत असतात आणि जागोजागीची अस्वच्छता, घाण हे आजार फैलावण्यास मदत करतात. अस्वच्छता आणि आजारपण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कितीही कृती आराखडे तयार केले असले तरी स्वच्छता आणि आरोग्यसेवा या दोन्ही बाबतीत ग्रामीण तर नाहीच पण शहर विभागसुद्धा समाधानकारक नाही. इतकी बेरोजगारी असताना ज्यादा कर्मचारी का नियुक्त होत नाहीत, आरोग्य सेवक, तज्ञ डॉक्टर्स यांची पदे रिक्त का ? दर महिन्याला पगार सुद्धा दिला जात नाही अशी तज्ञांची तक्रार का असावी? आरोग्यासारख्या अती महत्वाच्या बाबतीत असे का घडते आहे? जनतेचा रोष वाढतो आहे याची जाणीव आहे का?
सरकारी आरोग्य यंत्रणेचं निराशाजनक चित्र असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (कि सेवा?) अतीशय तेजीत आहे. गरीब जनतेला सुद्धा खाजगी डॉक्टरांकडे जाणे भाग पडते. असे का व्हावे? अनेकानेक प्रकारचे सरकारी कर भरणाऱ्या सामान्य जनतेला उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यासाठी प्रशासनाने अंतर्मुख होणे गरजेचे आहे. शासन वर्षानुवर्षे वैद्यकीय शिक्षणासाठी कितीतरी खर्च करते. विविध शैक्षणिक योजना, सवलती, आर्थिक मागासलेल्या वर्गाला सोई सवलती, हा आर्थिक बोजा शासन सहन करून दरवर्ष कितीतरी डॉक्टर्स पदवी घेतात. अशा वैद्यकिय पदवीधरांनी कमीत कमी 7 वर्षे सरकारी रुग्णालयात शहर तसेच ग्रामीण विभागात नोकरी केलीच पाहिजे, हे बंधन असण्याची गरज आहे. उत्तम आरोग्य आणि मार्गदर्शन जर जनतेला मिळाले तर लोकं स्वस्थ व सुखी होतील , या भावनेने अंतर्मुख होऊन आपले उत्तरदायित्व पार पाडावे. यातच सर्वांचे कल्याण आहे.
ुुु सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह- २०१२]
www.suhassohoni.blogspot.com
www.mazyasamvedana.com
No comments:
Post a Comment