Friday, January 15, 2016

दहशतवादाच सावट - किती काळ ?*



दहशतवादाच सावट - किती काळ ?*
            केंद्र व राज्यातील नेत्यांची अदलाबदल करून किंवा सत्तेत पक्ष बदल घडवून आणला तरीही आतंकवादी हल्ले थांबतील असे वाटत नाही कारण गेल्या कित्येक दशकांपासून तेच पक्ष आणि तेच नेते आलटून पालटून ‘राजयोग’ उपभोगताहेत, तरीसुद्धा आतंकी हल्ले सातत्त्याने होत असून सामान्य माणसांच रक्त वाहत आहे त्यांच्याबरोबर सैन्यदल, पोलीस दलातील अधिकारी व शिपाई यांच रक्त देशाच्या रक्षणासाठी वाहत आहे. हे असे का? आणि किती काळ चालणार? संथ पाण्यात दगड पडल्यावर खळबळ होऊन थोड्याच काळात शांतता निर्माण व्हावी असेच नित्य होत आल आहे. हे अघोषित युद्ध असून बिमोड करण्यास प्रत्येक वेळी शत्रू समोर नसतो. अशावेळी काही पुरावे सापडून पाकिस्तानला दोषी ठरवले जाते. शब्दांच्या फेरी झडतात. जमेल तेवढ्या ‘कडक’ शब्दात निषेध, इशारा दिला जातो. बस्स, पुन्हा आपसातील वादविवादाचा खेळखेळ सुरु होतो.
   आपल्याच देशात दहशतवादी संघटना किती सक्रीय आहेत, त्यांची कारणे काय? विदेशी आतंकवाद्यांना नागरिकत्व नसतांना कितीही काळ या देशात कसे काय राहता येते ?आपल्या देशात यांना नोकरी कशी काय मिळते?राहायला घर सुद्धा मिळते ,तपासणीतून यांची सुटका होते ,कुणाला संशय का येत नाही ? समुद्रमार्गे शस्त्रसाठा येतो हा अनुभव असतांना आपण गाफील तर नाही? भारतीय कमांडोज बरोबर तीन चार दिवस झुंज देणारे हल्लेखोर हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले सैन्यातील तरबेज अधिकारीच असू शकतात हे छुपे युद्धच आहे .यांना साधे हल्लेखोर समजण्याची चूक होऊ नये.देशातील गुन्हेगारी जगत,प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणा ,नेत्यांचा वैचारिक विरोध यामुळे महत्वाच्या विषयांवर वेळेवर निर्णय होत नाही, दुर्लक्ष होते दहशतवाद्यांचे फावते व अनर्थ घडतो .छुप्या मार्गाने आपल्या देशात ड्रग्ज आणले जाते ,करोडो रुपये त्याद्वारे कमाई  होते आणि तोच पैसा दहशतवाद्यांना पुरविलाजातो,आपल्याच देशात आतंकी हल्ले होतात .हे सत्य कधी मान्य होणार?
  किती काळ असणार आहे हे दहशतवादच सावट? आतंक पसरविणारी प्रशिक्षण केंद्रे जर माहित आहेत तर कुणासाठी आपण त्थांबलो आहोत ! किती काळ निषेध खलिते पाठवणार ?आपसातील टोकाची मतभिन्नता व कृतीच्या परिणामाबद्दल कदाचित वाटणारी साशंकता यामुळे ठोस निर्णय घेणे शक्य होत नसावे असे जाणवते ,पण वेळोवेळी निरपराध नागरिक आणि आपल्या जवानांचे जीव जातात ,जखमी होतात .देशावर मानसिक दडपण वाढते हे जास्त महत्वाचे आहे .आतंकवादी नेहमी भ्रष्टाचार्यांच्या शोधात असतात .निष्क्रियता , कर्तव्यात कसूर व लाच हे गुन्हे जास्त धोकादायक आहेत.यामुळे देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे .मात्र आता हे बदलायला हवं .घुसखोरांना ओळखून बाहेर काढणे जरुरी आहे.प्रत्येकाने काळजी घेणे जरुरी आहे.भारतीय असणे आवश्यक आहे .
सुहास सोहोनी ,९४०५३४९३५४