Thursday, December 20, 2012

अपघात, वेगनियंत्रण आणि संयम


अपघात, वेगनियंत्रण आणि संयम

    शहर कोणतेही असो, दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या आणि वेग यात प्रचंड वाढ होत आहे.  त्याचबरोबर रस्त्यांवरील   अपघाताच्या संख्येतही प्रचंड वाढ दिसते आहे.  वाहनांची गुणवत्ता निश्चितच सुधारत आहे.  पूर्वी पेक्षा  रस्ते मोठे होत असून दर्जा तात्पुरता सुधारतो आहे.  दुभाजकांमुळे  वाहन चालवणे सोपे आहे, मग अपघातांची संख्या का कमी होत नाही? खरा प्रश्न हा आहे की वाहनांच्या संख्येइतकी कुशल  वाहन चालकांची संख्या आहे काय? वाहतुकीच्या नियमांचे पालन न झाल्यास अपघाताची शक्यता वाढते.  15 ते 18 वर्ष वयाची किती मुले  मोटरसायकल  वेगात चालवतात? प्रत्येक वाहन नियमीत पणे सुस्थितीत ठेवले  जाते का? दुचाकीवर तीन, चार व्यक्ती कां प्रवास करतात? चालका जवळ  योग्य लाईसेन्स नसणे, गावात आणि गावाबाहेर भयानक वेगात वाहन चालवणे, रात्री अपरात्री भन्नाट वेगात प्रवास करणे, त्याही पेक्षा अंमली  पदार्थ/दारूच्या नशेत वाहन चालवणे या सर्वच गोष्टींचा  अचानक घडणाऱ्या  अपघाताशी अगदी जवळ चा संबंध आहे.
    कोणतेही वाहन, चालकाच्या मर्जनुसार हळू  किंवा वेगात धावते, वेगाचे नियंत्रण संपूर्णत: चालकाच्या हाती असते, पण वाहन चालवतांना मन जागृत,सावध आणि संयमी असेल  तरच वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहून अपघात टाळता येतील .  अपघाताबाबत दैवयोग हा मुद्दा असेल , त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही परंतु मानवी चुकांमुळे  होणाऱ्या  अपघातांबाबत नक्कीच विश्लेषण  व्हावयास हवे.   शहरातील  व हायवेवरील  खड्डे  , अयोग्य उंचीचे स्पिडब्रेकर्स हा प्रशासनाचा हलगर्जीपणाच आहे.  रस्त्यातील  खोल  खड्यात  गाडीला  उसळून कितीतरी लोकांना जीव गमवावा लागला  आहे.  अनेक लोक कायमचे जायबंदी झाले  तर अनेकांना स्पॉन्डीलिसीस सारखे दुर्धर आजार जडले  आहेत.  वाहन चालवतांना घडणाऱ्या  अनंत चुका टाळता येतात.  होणाऱ्या  नुकसानीची तिव्रता कमी करता येईल , कारण अपघातानंतर केवळ  हळहळणे  एवढेच आपल्या हाती उरते.  प्रत्येक व्यक्ती परिवारासाठी मौल्यवान असते. वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहेच, त्याबरोबर सावधचित्त असणे, वेगाने वाहन न चालवणे जास्त महत्वाचे आहे. दोन चाकी, तीन चाकी किंवा चार चाकी प्रत्येक वाहनचालकांसाठी ठराविक काळा नंतर नियमीत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था हवी. प्रत्येक वाहनचालक हा प्रशिक्षित, कुशल  व्हावा तरच संयमाने वेग-नियंत्रण साधुन अपघातात आपला  माणूस गमावण्याची वेळ  येणार नाही. कृपया वाहन चालवतांना मोबाईल वर बोलू  नका व कर्कश हॉर्न वाजवू नका.
                        ुुु  सुहास सोहोनी
                                   ९४०५३४९३५४
                             क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
                             www.mazyasamvedana.com

No comments: