Friday, January 15, 2016

दहशतवादाच सावट - किती काळ ?*



दहशतवादाच सावट - किती काळ ?*
            केंद्र व राज्यातील नेत्यांची अदलाबदल करून किंवा सत्तेत पक्ष बदल घडवून आणला तरीही आतंकवादी हल्ले थांबतील असे वाटत नाही कारण गेल्या कित्येक दशकांपासून तेच पक्ष आणि तेच नेते आलटून पालटून ‘राजयोग’ उपभोगताहेत, तरीसुद्धा आतंकी हल्ले सातत्त्याने होत असून सामान्य माणसांच रक्त वाहत आहे त्यांच्याबरोबर सैन्यदल, पोलीस दलातील अधिकारी व शिपाई यांच रक्त देशाच्या रक्षणासाठी वाहत आहे. हे असे का? आणि किती काळ चालणार? संथ पाण्यात दगड पडल्यावर खळबळ होऊन थोड्याच काळात शांतता निर्माण व्हावी असेच नित्य होत आल आहे. हे अघोषित युद्ध असून बिमोड करण्यास प्रत्येक वेळी शत्रू समोर नसतो. अशावेळी काही पुरावे सापडून पाकिस्तानला दोषी ठरवले जाते. शब्दांच्या फेरी झडतात. जमेल तेवढ्या ‘कडक’ शब्दात निषेध, इशारा दिला जातो. बस्स, पुन्हा आपसातील वादविवादाचा खेळखेळ सुरु होतो.
   आपल्याच देशात दहशतवादी संघटना किती सक्रीय आहेत, त्यांची कारणे काय? विदेशी आतंकवाद्यांना नागरिकत्व नसतांना कितीही काळ या देशात कसे काय राहता येते ?आपल्या देशात यांना नोकरी कशी काय मिळते?राहायला घर सुद्धा मिळते ,तपासणीतून यांची सुटका होते ,कुणाला संशय का येत नाही ? समुद्रमार्गे शस्त्रसाठा येतो हा अनुभव असतांना आपण गाफील तर नाही? भारतीय कमांडोज बरोबर तीन चार दिवस झुंज देणारे हल्लेखोर हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले सैन्यातील तरबेज अधिकारीच असू शकतात हे छुपे युद्धच आहे .यांना साधे हल्लेखोर समजण्याची चूक होऊ नये.देशातील गुन्हेगारी जगत,प्रशासनातील भ्रष्ट यंत्रणा ,नेत्यांचा वैचारिक विरोध यामुळे महत्वाच्या विषयांवर वेळेवर निर्णय होत नाही, दुर्लक्ष होते दहशतवाद्यांचे फावते व अनर्थ घडतो .छुप्या मार्गाने आपल्या देशात ड्रग्ज आणले जाते ,करोडो रुपये त्याद्वारे कमाई  होते आणि तोच पैसा दहशतवाद्यांना पुरविलाजातो,आपल्याच देशात आतंकी हल्ले होतात .हे सत्य कधी मान्य होणार?
  किती काळ असणार आहे हे दहशतवादच सावट? आतंक पसरविणारी प्रशिक्षण केंद्रे जर माहित आहेत तर कुणासाठी आपण त्थांबलो आहोत ! किती काळ निषेध खलिते पाठवणार ?आपसातील टोकाची मतभिन्नता व कृतीच्या परिणामाबद्दल कदाचित वाटणारी साशंकता यामुळे ठोस निर्णय घेणे शक्य होत नसावे असे जाणवते ,पण वेळोवेळी निरपराध नागरिक आणि आपल्या जवानांचे जीव जातात ,जखमी होतात .देशावर मानसिक दडपण वाढते हे जास्त महत्वाचे आहे .आतंकवादी नेहमी भ्रष्टाचार्यांच्या शोधात असतात .निष्क्रियता , कर्तव्यात कसूर व लाच हे गुन्हे जास्त धोकादायक आहेत.यामुळे देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे .मात्र आता हे बदलायला हवं .घुसखोरांना ओळखून बाहेर काढणे जरुरी आहे.प्रत्येकाने काळजी घेणे जरुरी आहे.भारतीय असणे आवश्यक आहे .
सुहास सोहोनी ,९४०५३४९३५४

Saturday, January 9, 2016

*नेतृत्वहीन व दिशाहीन जनसमुदाय *



*नेतृत्वहीन व दिशाहीन जनसमुदाय *
          कुठल्याही कारणांनी आपला रोष प्रगत करतांना जेंव्हा जमाव रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्या जमावाला चेहरा नसतो .परिणामाची पर्वा नसते .त्यात जर नेतृत्व नसेल तर सैरावैरा लोंढ्यासारखा उसळणारा जमाव म्हणजे जणू काही फुटलेल्या धरणातून रोरावत निघालेले पाणीच .कधीही ,काहीही घडू शकते .आपल्या दैवतांवर अतीव भक्ती असणारा हा दुखावलेला समूह नेतृत्वाची वाट पाहत थांबत नसतो.स्वयंस्फुर्तीने निषेध नोंदविण्यास रस्त्यावर उतरलेला असतो ,आणि म्हणूनच दिशाहीन बनण्याची फार जास्त शक्यता असते .असा हा समूह उग्र क्रूर आणि हिंसक बनला तर नवल नाही .सत्ताधारी व प्रस्थापिता विरुध्ध गरळ ओकत आडव्या येणाऱ्या कोणाच्याही संपत्तीची सहज राख रांगोळी करतो जीव हानी ,वित्तहानी होते .विकास थांबतो पण भान संपलेले असते ,मग सुरु होतो हिंसाचार .
          असं का होते ? ही माणसे हिंसा का करतात ?ही क्रांती नसते आणि युध्द तर नसतेच किंवा सशस्त्र बंड ही नसते .निषेध व्यक्त करणे गरजेच असले तरी देशाच्या प्रगतीला खिळ घालणे व स्वतःच्या साधन संपत्तीचा नाश करणे हे योग्य नाही.गरिबीने होरपळलेली उपेक्षित ठेवलेली लाखो करोडो डोकी संताप ग्रस्त होत आहेत ,प्रक्षोभित होऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा करताहेत म्हणजेच अजून भेदभावाची प्रचंड दरी आहे, समानता नाही, परिपक्वता नाही ,मुळात ऐक्य नाही ,प्रत्येक जण माझं, आमच, वेगळेपण प्रकर्षाने सांभाळतो आहे .कसे होईल भारतीय ऐक्याचे ?
           शिक्षण झालेले बरेच तरुण स्पर्धेत मागे पडतात ,बेरोजगारीने त्रस्त आहेत इच्छा आकांक्षा वाढल्या आहेत पण त्या पूर्ण होत नाहीत त्यात व्यसने लागलेली. मार्ग दाखवायला जबाबदार नेता नाही .”रिकाम्या मनात सैतानाचा संचार असतो “हे सत्य आहे .कुणीही यावं ,जनसमुदायाला भडकावणार भाषण करावे ,टाळ्या मिळवाव्या आणि दिशाहीन डोकी होरपळण्या साठी झोकून द्यावी .हे थांबायला हवं. प्रत्येक समाज घटकांत देशहित संभाळणार नेतृत्व हवं .कुठेही अनुचित घटना घडू नये ,हिंसा ,नुकसान होऊ नये या गोष्टी कौशल्याने हाताळणाऱ्या नेत्याची गरज आहे .जमा झालेला अफाट जनसमुदाय एखादे सकारात्मक कार्य करू शकेल .यांना भ्रष्टाचाराचा ,समाज कंटकाचा राग यायला हवा .सकारात्मक विचार बिम्बवणारे आई बाप व  शिक्षकांनी मुलांना सन्मान व देशहित जोपासायला शिकवायला हवे .हिंसक घटनांमुळे आपण अनेक वर्षे मागे जातो याचे भान हवे .हिंसेने फक्त प्रतीहिंसा आणि युगायुगांचा द्वेष जोपासला जातो मात्र आपसातील विश्वास आणि प्रेमभाव कायम सुख –समृद्धी प्रदान करतो .
सुहास सोहोनी ,
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती ४४४६०६ ,फोन २५६७४६३ ,मोब.९४०५३४९३५४ facebook.com       /mazyasamvedana

Thursday, January 7, 2016

* अराजकतेच्या उंबरठ्यावर *



                            * अराजकतेच्या उंबरठ्यावर *
          उंच पर्वतावरून घसरणाऱ्या खडकाचे प्राक्तन काय असू शकते ! मध्ये जर काही भक्कम आधार नाही मिळाला तर गडगडत खोल दरीत कोसळणार ,दुसरे काय ! अफाट विश्वातील या पृथ्वी नामक ग्रहावरील मानवी संस्कृतीचे सध्या असेच काहीसे झालेले दिसते .प्रत्येक राष्ट्राला इतरांपेक्षा प्रबळ बनण्याची इर्षा आहे . “विकास” या कल्पनेने पुरते पछाडलेले आहे .निसर्गाला बटिक बनवून सगळी भौतिक सुख ओरबाडून कशी पदरात पडून घेता येतील या साठी समस्त मानवी मेंदू कार्यरत आहेत .विकास आणि यश या दोन्हीचे नेमके अर्थ आणि मर्यादा यांचे आकलन होत नसल्याने जीवनाचे अंदाज चुकताहेत ,असे निष्कर्ष नित्य समोर येत आहेत.यशाच्या शिखराकडे मानवी संस्कृती जात आहे कि हा भास आहे ?
           स्वतःला प्रगत समजणारी सगळीच राष्ट्र आज विविध संकटात आहेत .सुबत्तेत अग्रेसर असणारी अमेरिका आणि युरोपातील बरेच देश आज प्रखर आर्थिक विवंचनेत आहेत विकासाच्या नावाखाली “अनुत्पादित “गोष्टींवर संपूर्ण जगात प्रचंड खर्च होत असल्याने जागतिक मंदीची लाट आली नाही तरच नवल .सध्या असलेली आणि भविष्यात कितीतरी पतीने पतीने वाढणारी भीषण महागाई हि केवळ एक चुणूक आहे .जगभरातील कामगार कपात ,डॉलर आणि रुपया यांची घसरण ,आर्थिक नाकेबंदी ,गुंतवणूक दारांची नित्य उघडकीस येत असलेली फसवणूक ,अफरातफर ,प्रचंड भ्रष्टाचार ,सतत घाम फोडणारा शेअर बाजार , व्याज दर वाढवून बँक व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न ,गरीब आणि श्रीमंतीची द्रुत गतीने वाढणारी तफावत या सगळ्या गोष्टी काय सुचवतात ?फक्त अस्थिरता !
         उत्तर आफ्रिका ,पश्चिम आशिया ,युरोप सशस्त्र क्रांती किंवा आतंक वादाने त्रस्त आहे .प्रस्थापितांना उखडून फेकले जात आहे . हिंसा आणि प्रतीहिंसा उग्र रूप धारण करीत आहे .मध्य आशियात दहशत वादाची प्रशिक्षण केंद्रे तयार आहेत .धर्म आणि पंथाच्या नावावर राष्ट्रे एकमेकांच्या जीवावर उठली असून बलाढ्य राष्ट्रे त्यांना  शस्त्र पुरवित आहेत .शस्त्रसज्ज होऊन संधीची वाट पाहत आहेत .अणुशक्ती व हैड्रोजन शस्त्रांचे परीक्षण सुद्धा होत आहे .एकमेकाला अणु युद्धाची धमकी दिली जात आहे .रासायनिक शस्त्रांचा वापर होत आहे .वास्तविक अणुउर्जा म्हणजे बंद बाटलीतील राक्षस आहेत ,याचे भान नाही .यामुळेच भूगर्भातील हालचालींना जरा जास्त वेग आला आहे .त्यामुळे भूकंप ,जलप्रलय होत आहेत .
        पृथ्वीवर नैसर्गिक प्रकोप नेहमीच होत असतात पण खर्या अर्थाने नुकसान होणार असेल तर ते *”मानवी मेंदूतील “प्रकोपामुळे निसर्गातील समतोल बिघडवल्या मुळे आपण कदाचित अराजकतेच्या उंबरठ्या वर उभे आहोत आणि वेळेवर न सावरल्यास गडगडण्याची वेळ येऊ शकते .
                                 सुहास सोहोनी
                       विवेकानंद कॉलोनी ,अमरावती ४४४६०६ .
                        फोन २५६७४६३ मोब.९४०५३४९३५४
                       http://suhassohoni.blogspot.com