Sunday, March 6, 2016

*सुखी स्त्री म्हणजेच सुखी घर*



              *सुखी स्त्री म्हणजेच सुखी घर*
         १९०७ साली अमेरिकेत न्यूयॉर्क येथे उद्योगजगतातील महिलांची एक परिषद आयोजित केली होती त्यासाठी मोठ्यासंखेने जगभरातील महिला एकत्र आल्या व त्यांनी मतदानाचा हक्क तसेच विविध सोई सवलतींच्या मागण्यांचे निवेदन दिले .या घटनेच्या स्मरणार्थ ८ मार्च १९०८ रोजी दरवर्षी ८ मार्च हा महिला दिन घोषित झाला.भारतात ८ मर्च १९४३ पासून महिला दिन साजरा होऊ लागला.
         प्रत्यक्षात एक वस्तुस्थिती स्पष्ट आहे कि निसर्गात मानवासहित प्रत्येक प्राण्यात (फक्त काही अपवाद वगळता) नर आणि मादी या दोनच प्रजाती असून त्या एकमेकांसाठी आवश्यक आहेत. स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. दोघांची प्रकृती व जीवनकार्य भिन्न आहेत. प्रत्येक जीव विशिष्ट काळानंतर नष्ट होणार या नियमामुळे निसर्ग संतुलन साधण्याकरिता प्रजनन आवश्यक ठरते. स्त्री-पुरुषांचे कार्यक्षेत्र ठरले. शक्तीच्या मर्यादा पडल्या. विविध आपतींपासून स्त्रीचे रक्षण करणे हे पुरुषाचे महत्वाचे कार्य ठरले, त्यातूनच पुरुषप्रधान संस्कृती सहजच मान्य झाली. उपजत बुद्धीचे वरदान लाभलेल्या माणसात महात्वाकांक्षा आणि लोभ जोर धरु लागला आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे दुष्परिणाम दिसू लागले. स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर नेहमीच बंधने घातली गेली. मतस्वातंत्र्य जिथे नाही तिथे मतदानाचा अधिकार कसा शक्य असणार? पण ८ मार्च १९०८ साली स्त्रियांचा मतदानाचा हक्क मान्य झाला आणि नवे पर्व सुरु झाले.
         आज हळूहळू स्त्री स्वावलंबी होत असून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात स्वतःचा प्रभाव ती सिद्ध करीत आहे. गुणवत्तेत स्त्री कुठेही कमी नाही.असे असले तरी हे प्रमाण कमी आहे. खेडे असो कि शहर स्त्रियांना संरक्षणाची गरज आहे. अत्याचारात नित्य वाढ झालेली दिसते. प्रत्येक कुटुंबात स्त्रीला संपूर्ण सन्मान दिला जातो का? आणि नसेल तर असे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःशी विचारावयास हवा. पुरस्कारापुरता महिला दिन साजरे होण्या ऐवजी स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर व सन्मान मान्य करून तसे वर्तन घडण्याची गरज आहे. संसाररुपी रथाची स्त्री-पुरुष हि दोन्ही चाके सक्षम हवीत, तरच हे जीवन कृतार्थ बनेल . ज्या घरात स्त्री दु:खी असेल ते घर कधीही सुखी राहू शकणार नाही.

                                                      
                                                        सुहास सोहोनी
                                                 विवेकानंद कॉलनी, अमरावती-६
                                               फोन ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.
                                                  www.suhassohoni.blogspot.com/www.facebook.com/mazyasamvedana