*मोबाईलचा वापर जरा जपून*
विज्ञानाचा एक चमत्कारी अविष्कार म्हणजे मोबाईल , भ्रमण यंत्र. अफलातून उपयुक्त संशोधन. जीवाभावाचा सोबती. तळहातावर मावणारे हे छोटेसे यंत्र आणि यंत्रणा दिवसरात्र किती अफाट काम करीत असतं की आश्चर्याला पारावार नाही. एक फार मोठा उद्योग समुह मोबाईल या उपकरणाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल करतो आहे. जगभर असलेल्या मोबाईल ग्राहकांसाठी नवनवे डावपेच लढवले जात आहेत. किफायतशीर दर, तत्परसेवा, प्रलोभनांचा अतिरेक अशा विविध क्ल्रुप्त्यांचा कल्पक वापर करून अजस्त्र अस नेटवर्क अविरत कार्यरत आहे. विज्ञानाचा अविष्कार आणि प्रगत मार्केटींगचा हा सुरेख यशस्वी मेळ आहे.
मोबाईलची उपयुक्तता नाकारण्याचा प्रश्नच नाही पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. योग्य अयोग्य, चांगले , वाईट, हितकारक नुकसानकारक, खरी गरज आहे ती या दोन्ही बाजू तपासून समजून घेण्याची. दिवसेदिवस मोबाईल फोनचा वापर प्रचंड वाढणारं आहे. ती एक क्रेज बनणार आहे. अबाल वृद्ध सर्वच याचा अतिरेक करणार आहेत. त्यातच अभिमान, कौतुक दर्शवले जाणार आहे. खरे तर निसर्गाचा एक अत्यंत साधा, प्राथमिक नियम आहे "अति तेथे माती.' निसर्ग स्वत:चे नियम कधीही मोडित काढत नाही आणि कधीही कुणालाही क्षमा करत नाही. अतिरेकाच्या हव्यासापाई आपण नेहमीच प्राथमिक सत्य विसरून जातो. शरीराला बिलगून असलेलं मोबाईल चं उपकरण व प्रत्येक शहरात दिमाखात उभे असलेल्या टॉवरच जाळ , त्यातून प्रसारित होणारे किरणांचे प्रभाव शरीराला धोकादायक आहेत हे सत्य नाकारता येणार नाही.
पशुपक्षांवर या टॉवरच्या फ्रिक्वेन्सी रेंज चा प्रभाव पडतो आहे हे आता मान्य झाले आहे. मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये राहणारे नागरीक नित्य रेडिएशनच्या धोक्यात आहेत त्यांना मेंदूचे विकार, त्वचा विकार, क°न्सर, या विकारांची शक्यता जास्त असते. शहरांमध्ये गर्दीच्या वसाहतीत घरांवर टॉवर उभे करण्यास परवानगी नसावी. रेडिएशनचा धोका कसा कमी करता येईल यासाठी ठोस कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मोबाईल उपकरण कधीही निर्जिव नसतं. ते कायम सुक्ष्म लहरींची देवाण घेवाण करीत असतं. म्हणजेच आपल्या शरीरावर त्या लहरींचा हळु हळू प्रभाव सुरू असतो आणि नेमका हाच धोका आपण सहज विसरून जातो. आपल्या शर्टाच्या डाव्या खिशात मोबाईल ठेवणे, म्हणजे जिवंत बाँम्ब खिशात ठेवण्यासारखेच आहे, ही गोष्ट समजून घ्यायला हवी. कानाद्वारे आवाजाद्वारे सुक्ष्म लहरी मेंदूत पोहोचतात. त्वचेवर परिणाम होऊ शकतो. रस्त्यावर फोनवर बोलत हातवारे करत मोठमोठ्या ने हसत, बडबडत जाणारे महाभाग, यांची संख्या वाढत आहे. खांद्यावर मोबाईल ठेवून मान कलती करून भरधाव वाहन चालवणारे तर खूपच आहेत त्यांना मानेच्या नसांचा विकार होण्याची, मानेतील स्नायूंमधे कायमचे वाकडेपण येण्याची जास्त शक्यता आहे. लहान मुलांच्या मानेच्या नसा नाजूक असतात. ही सवय घातक आहे. कृपया मोबाईल वर बोलत असताना वाहन चालवू नये. अपघात होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक मोबाईल धारकांनी धोक्याच्या शक्यतेची माहिती मिळवावी. काही चुकत असल्यास दुरुस्ती अवश्य करावी. मोबाईलचा वापर अवश्य करावा पण जरा जपून.
सुहास सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह - ]
www.facebook.com/mazyasamvedana
ुुु
No comments:
Post a Comment