Thursday, December 20, 2012

बुद्धीची निर्यात थांबवा


       * बुद्धीची निर्यात थांबवा *

    आजकाल  इयत्ता चौथीत मुलाला /मुलीला  98 ते 100 टक्के मार्कस्‌ मिळाले  (आजकाल  सगळ्या  शाळा  ही काळजी घेतात.) कि आईबाबांचा आनंद फेसाळत्या कारंज्यासारखा गिरक्या घेत असतो.  कुणीतरी काका किंवा मामा भविष्य वर्तवितो की आमचा बाळ्या  मोठेपणी अमेरिकेत  जाणारच.  मग हेच स्वप्न आणि ध्येय घेऊन मुले  मोठी होतात की, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन तेथेच नोकरी करायची.  परदेशात पैसा कमवायचा आणि भारतात प्रतिष्ठा  मिळवायची.  परदेशी शिकणारी किंवा नोकरी करणारी मुले  असणाऱ्या  परिवारांसाठी हा एक स्टेट्‌स सिंबॉल  झालेला  आहे.  ब्रिटीशांच्या शासन काळात अनेक भारतीय विख्यात व्यक्तिनी परदेशी शिक्षण घेतले .  तेव्‌हा पासून आजतागायत ही क्रेझ वाढलेली  आहे.  मुळात भारतीयांचा मेंदू दर्जेदार आहेच त्याचे कारणही भारतीय संस्कार आणि शांततेने विविध ज्ञान आकलन करण्याची लालसा आणि क्षमता हे आहे.  याच गुणांच्या बळावर भारतीय बुद्धीमत्ता जगात प्रभावी आहे.
    विदेशातील  स्थानीक कामगारांपेक्षा भारतीय कामगार स्वस्तात उपलब्ध होतात पण तीच रक्कम आपल्याकडे भरपूर वाटते.  त्याचप्रमाणे विदेशात भारतीय व्यक्‌तीला  सहसा दुय्यम दर्जाचेच काम दिले  जाते, आणि त्यांचा अधिकारी हा स्थानिक असतो हे सुद्धा सत्य आहे.  पाश्चिमात्य देशांमध्ये आशियाई तरुणांकडे बघण्याची दृष्टी  ही नक्कीच पुर्वग्रह दुषीत आहे.  ही गोष्ट  वेळो वेळी  सिद्ध झालेली  आहे.  अनेक दुर्दैवी घटनांमध्ये अनेकवेळा  आशियाई तरुणांचा सहभाग होता हे सुद्धा खरं आहे.  अशा अनेक बाबींचा परिणाम दिसून येतो.  भारतीय विद्यार्थ्यावर, कामगारांवर होत असलेले  जीव घेणे हल्ले  हा एक काळजी करण्याचा विषय नक्कीच आहे.  जागतिकीकरणाच्या कितीही गप्पा होत असल्या तरी शिक्षणासाठी तसेच व्यवसाय वा नोकरी साठी येऊन वसणारे परदेशीय कुणाही स्थानीकांना कधीही आवडत नसतात आणि त्यातूनच विविध नको असलेल्या घटना घडतात.
    उच्चशिक्षित भारतीय तरुण भारतात उद्योग सुरू करून चांगले  दर्जेदार उत्पादन का निर्माण करीत नाहीत, हा एक वेगळा  अभ्यासाचा विषय होऊ शकतो.  दैनंदीन जीवनात दररोज उपयोगी असलेल्या असंख्य वस्तू आपल्याच देशात तयार होत नाहीत, तोपर्यंत उद्योजकता वाढीस लागणार नाही.  विदेशी कारखानदार इथे कारखाने थाटतात तर भारतीय उद्योजकांची पिछेहाट का होते आहे? भारतीय उत्पादनांचा दर्जा, जाहिरात, विपणन व्यवस्था यात कमतरता का भासते? प्रत्येक वस्तूसाठी ग्राहक विदेशी वस्तू का स्विकारतो? भारतीय वस्तूंचा तुलनात्मक दर्जा कमी प्रतीचा असून किंमत मात्र जास्त आहे.  शासनाकडून सोयी सवलतीत दिरंगाई होत असेल , तर का? जमीन, पाणी, मजूर मुबलक असून आमचा तरुण वर्ग विदेशात नोकरीसाठी आकृष्ट  का होतो आहे? याचा शासनाने गांभिर्याने विचार करावा.  प्रखर बुद्धिमत्ता असलेले  तरुण आपल्या देशाच्या कामाचे नाहीत.  त्यांच्या बुद्धीचा उपयोग विदेशी उद्योजक करून घेतात ही खंत आहे.  या परिस्थितीत लवकर बदल  होणे आवश्यक आहे.  भारतीय दर्जेदार मालाची निर्यात व्हावयास हवी असेल  तर आधी भारतीय बुद्धीची निर्यात थांबवा.
सुहास सोहोनी   ९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
www.facebook.com/mazyasamvedana

                        ुुु

No comments: