Sunday, November 6, 2016

* ब्रेकिंग न्यूज वर निर्बंध हवे *


                  * ब्रेकिंग न्यूज वर निर्बंध हवे *
            प्रसार माध्यमांना दररोज दर तासाला ब्रेकिंग न्यूज हवी हवीशी वाटते हे जरी खरे असले तरी कोणत्या विषयाला कसे हाताळायचे याच भान असण्याची गरज आहे.बर्याच प्रसंगी योग्य अयोग्य याचा विचार केला जात नाही .सध्याच्या भारतीय सैन्य विषयक असलेल्या घटना ,त्या घटनांचा संरक्षण मंत्रालयाशी असलेला संबंध ,कुणी कसे वागायला हवे होते याविषयी गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्याच विद्वानांचे अनावश्यक मतप्रदर्शन हे सर्व दुखःद असून दुर्दैवी आहे .शत्रूशी दोन हात करून देशाच संरक्षण करणारी भारतीय फौज ,तिची आजची क्षमता ,लोकशाही प्रणाली मध्ये तिन्ही सैन्यावर असलेला संरक्षण मंत्रालयाचा अंकुश,त्या विषयीची विविध कागद पत्रे ,अहवाल ,आदेश या सगळ्या गोष्टी अत्यंत गोपनीय असाव्यात ,हे अभिप्रेत असतांना देशाच्या प्रत्येक गल्ली गल्लीत याविषयी चेष्टायुक्त चर्चा होते .अत्यंत घिसडघाईने बातम्यांचा मसाला जनतेला पुरविला जातो .हे योग्य आहे का ?
            प्रत्येक बातमी आमच्याच न्यूज च्यानल वर सर्व प्रथम आम्हीच दाखवली ,असे सांगणाऱ्या चेनलला सैन्यदलाच्या क्षमतेचा गोपनीय अहवाल कुणी आणून दिला याची चौकशी व्हावयास हवी .अशा अत्यंत गोपनीय बातम्या नको तितक्या उत्साहात प्रसिद्ध करण्या आधी कुणाची परवानगी घ्यावी लागते की नाही ? काही एडिटिंग करण्याची तरी गरज आहे की नाही ? हातात माईक आणि समोर न्यूज च्यानेल चा केमेरा असतांना खऱ्या अर्थाने संयमाची गरज आहे .अत्यंत गंभीर प्रकरणाशी संबंधित असलेल्या घटना व व्यक्तींवर हि रिपोर्टर मंडळीनुसते आरोप करून थांबत नाहीत तर त्यांना गुन्हेगार ठरवून कोणती शिक्षा दिली जाऊ शकते हे सुद्धा ठरवून मोकळे होतात .हा स्वातंत्र्याचा अतिरेक होत आहे का ?
            ज्या विषयातील आपल्याला कवडीच समजत नाही ,सैन्य ज्यांनी कधीही पाहीले नाही ,कुठलाही अभ्यास नसलेल्या तद्दन लेखणी बहाद्दरांनी आपल्या लेखणीला लगाम घालण्याची गरज आहे .वैचारिक गोंधळ निर्माण होऊ शकेल असे घाईघाईने निष्कर्ष काढून मतप्रदर्शन करण्याची गरज नाही .मुख्य म्हणजे अशा प्रत्येक घटनांच्या वेळी जगासमोर आपल्या देशाची प्रतिमा कशी दिसेल याचा विचार व्हावा .देशाचे अनेक शत्रू असतांना भारतीय फौज सक्षम, प्रबळ हवी .कारण युद्ध संकटाच्या वेळी कुणीही समोर येत नाही,त्या वेळी देशासाठी सर्वोच्य आधार असत आपले बलाढ्य सैन्य .अनिर्बंध स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या भारतीय नागरिकांनी संयमाने ,संतुलित मानाने आत्मपरीक्षण करावे .प्रसार माध्यमांनी जास्त प्रगल्भ व्हावे व ब्रेकिंग न्युजवर निर्बंध आणावे .
*लेखसंग्रह : घे उंच भरारी [२०१६]
*लेखक : सुहास सोहोनी    [ ८६२६०६०६४६ ]