* आर्थिक अरिष्ट आणि भारतीय जीवनमुल्ये *
भारतीय जीवनपद्धतीत नित्य काही तत्वे शिकवली जातात. अंथरुण पाहून पाय पसरावे, कर्ज शक्यतो कधी घेऊ नये, सट्टा, जुगार, व्यसने यापासून नित्य दूर असावे. आरोग्य सांभाळावे, मन:शांती असू द्यावी. ह्या विचारसरणीचं पालन करणारे असंख्य परिवार त्यांच्या दृष्टीने सुखी, समाधानी आहेत. मात्र अट्टाहासाने याविरूद्ध जीवनशैली जगणारे, मग ते कोणत्याही देशातले असोत, समाधानी आहेत ? कितीही कालखंड बदलले तरी चांगली तत्वे ही सुसंस्कार असतात, ती नेहमीच दीपस्तंभासारखीच असणार आहेत. हेच सत्य आहे. भारतीयांवर अमेरिकेचा [ विदेशाचा ] पगडा आहे हे खरे आहे. क्रेडीट कार्डद्वारे कर्ज घ्या , हवं ते खरेदी करा, आजच सगळी सुखं मिळवा, कर्ज घ्या आणि सेकंड होम घ्या , वाहन घ्या , विमानप्रवास करा. आणखीन सुखाच्या काय काय कल्पना सुचतील त्या पुर्ण करा. असे हे अमेरीकी विचाराचं आक्रमण भारतीयांवर सतत होतं आहे. अनुत्पादित वस्तूंसाठी आमच्या श्रमाच्या मिळकतीतील मोठा वाटा आम्ही खर्च करत चाललो आहे.
सट्टा, जुगार, लॉटरी व शेअरबाजार ही सगळी भावंडच आहेत. परंतु शेअरबाजाराचा तंत्रशुद्ध अभ्यास करून व्यवसाय रुपाने स्विकार करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. अनेक पटीत फायदा होण्याची स्प्ने दिसत असल्याने असेल नसेल ती पूंजी शेअर खरेदीत ओतली जाते. राज्यकर्त्याच्या नितीप्रमाणे सगळा काळा , गोरा अगदी स्वीस बँकेतील पैसा सुद्धा शेअर बाजारात पोहोचला . आमचया अनेक वित्तिय कंपन्यांनी लेहमन सारख्या विविध कंपन्यात गुंतवणुक केली . पण हर्षद मेहता भारताबाहेरही आहेत हे सिद्ध झाल्यामुळे पुन्हा आता, कोट्याधिशांचे लखपती झाले . शेअर बाजाराच्या उलाढालीच्या या खेळात दया माया नसते. इथे कितीतरी रावांचे रंक झालेत. रक्तदाब व हृदयरोग हे जोडीने सोबती असतात. टेंशन, चिडचिड असते. पाण्याबाहेर काढलेल्या मासळी सारखी तडफड होते. पण व्यसन आणि आशावाद माणसाला स्वस्थ बसू देत नाही, आणि नावाजलेल्या चांगल्या कंपन्यांचे कमी भाव झाल्यामुळे , असे शेअर तो पुन्हा विकत घेतो.
आपला श्रमाने मिळवलेला पैसा कसा सांभाळावा हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ** दर्जेदार उत्पादनांवर आमच्या देशाचं अर्थशास्त्र अवलंबून असण्याऐवजी परदेशातल्या शेअर निर्देशांकावर दुर्दैवाने आधारीत आहे. ** हे वेळो वेळी सिद्ध होत आहे. पूर्वीच्या काळी परदेश व्यापार हा आमच्या बहुआयामी अर्थ शास्त्रातील एक भाग होता, परंतु आज अवाढव्य कर्जाची उभारणी, अनुत्पादीत खर्चावर भर आणि परदेशात विविध प्रकारे योगदान, गुंतवणुक यांचा अर्थशास्त्रावर भार आहे, अर्थनितीवर भर आहे. भविष्यात कधीही गडगडणाऱ्या सेंसेक्सचा फारसा प्रभाव भारतावर पडणार नाही असे म्हणणे ही दिशाभूल आहे. खिऴ खिळया झालेल्या नियंत्रण सुटलेल्या वाहनाचा अपघात झाला , आणि त्या वाहनात आम्ही असूनही आम्हाला मात्र दुखापत होणार नाही हे कसे ? उंच टेकडीवरून सुटलेला , गडगडणारा दगड मध्ये भक्कम आधार असला तरच स्थिरावतो. अन्यथा !!
ुुु सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
www.mazyasamvedana.com
www.suhassohoni.blogspot.com
No comments:
Post a Comment