Thursday, December 20, 2012

शाळा , कॉलेजची परिक्षा ही अंतीम लढाई नक्कीच नाही


* शाळा , कॉलेजची परिक्षा ही अंतीम लढाई नक्कीच नाही *

    परिक्षेत कॉपी करू दिली  नाही म्हणून मोठ्या  प्रमाणात मुले  नापास होत आहेत, हा विचार आणि निष्कर्ष चुकीचा तसेच दुर्दैवी आहे.  म्हणजेच कॉपी करून बरीचशी मुले  आजपर्यंत पास होत गेली .  अभ्यास नसतांना हिच मुले  पुढे जबाबदारीची पदे सांभाळणार आहेत.  पायाच जिथे कच्चा असेल  तर अपेक्षा काय ठेवायची ! कठोर परिश्रमाने पास झालेल्या चांगल्या मुलांची  संधी नक्कीच डावलली  गेली  असेल .  चुकीच्या मार्गाने हवं ते मिळवणारे भविष्यात नेहमीच शॉर्टकटचा अयोग्य मार्ग निवडणार कारण एकदा लागलेली  सवय आणि मिळालेल  यश प्रत्येकवेळी  वाकडं पाऊल  टाकायला  आकृष्ट  करणार, हे अगदी सहज आहे.  प्रश्न पत्रीका आधीच मिळवणे, कॉपी करणे, गुण वाढवून घेण्यासाठी साम, दाम, दंड, नितीचे सर्व प्रयत्न करणे आणि लायकी नसतांना पास होऊन चांगल्या नोकऱ्या  पटकावणे या  सर्व गोष्टी  निरोगी अशा समाजासाठी हिताच्या नाहीत.
    गुणवान, प्रज्ञावान, शीलवान मुले शाळां मधून तयार होतात का? वेळोवेळी  नित्य, शिक्षणपद्धतीत बदल  करीत राहण्याने त्याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतो आहे का ? या प्रश्नांचा विचार होत नसावा.  आजच्या मुलांना भविष्यातील  अनिश्चितता सतत भेडसावते आहे, त्याचवेळी  पालक व नातेवाईकांच्या अवास्तव अपेक्षा व हट्ट मुलांचा ताण वाढवण्यास मदतच करीत आहे.  शाळे व्यतिरिक्त व्यस्त असलेल्या ट्युशन क्लासमध्ये सुद्धा अभ्यास ……? "समजत' नाही.  हेच या वर्षी   सिद्ध झाले  आहे.  ज्या शाळां चे 8 टक्‌के, 10 टक्के निकाल  लागले  आहेत त्या शाळा  नक्की कशाप्रकारे मुलां कडून अभ्यास करवून घेतात? दोष शिक्षण पद्धतीचा, संस्थेचा, शिक्षकांचा, पालकांचा कि मुलांचा? सर्व प्रकारचे अनुदान मिळवून आज शिक्षकांना भरपूर पगार दिला  जातो, पालक मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन खर्च करतात, काळजी करतात, काळजी घेतात पण फळ  मिळत नसेल  तर चुक कुठे होते आहे, आणि पुढे काय?
    मन लावून अभ्यास करणे, अभ्यासाची आवड कशी निर्माण होईल  यासाठी पालक, गुरुजनाची अमुल्य मदत घेणे, एकाग्रता आणि परिश्रमाने विद्यार्जन करून प्रत्येक टप्प्यावर सुयश मिळवणे हेच विद्यार्थ दशेतील  प्रमुख कर्तव्य आहे हे मुलांना पटेल , समजेल  असे सांगण्याची गरज प्रत्येक पिढीत कायम असणार आहे.  उज्वल   भविष्यासाठी परिक्षा उत्तम दर्जाने उत्तीर्ण होणे आवश्यक आहेच. मुलां सोबत नेहमीच सुसंवाद हवा, चर्चा हवी, मात्र ताणतणाव आणि आग्रह टाळला  पाहिजे.  परिक्षेत कमी गुण मिळणे किंवा नापास होणे सुद्धा शक्य आहे.  पण अशा मुलांना निराश न होऊ देणे,  त्यांना सकारात्मक ऊर्जा देणे, त्यांच्यात विश्वास निर्माण करणे हे पालकांचे काम फारच महत्वाचे आहे.  कारण शालेय परिक्षेत अव्वल  नसेल  तरी भविष्यात जीवनाच्या संघर्षात नक्कीच विजय प्राप्त होऊ शकतो, फक्त गरज आहे दृष्टीकोन बदलण्याची व परिश्रम करण्याची.  शाळा , कॉलेजची परिक्षा ही अंतिम लढाई नक्कीच नाही.जीवनाच्या संघर्षात भविष्यात
कितीतरी प्रसंगी अनेक प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि अडचणीतून यशस्वी मार्ग काढावा लागतो
हे मुलांना निट समजावून सांगायला हवे .
             सुहास सोहोनी 
         क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२ ० १ २ ]
           www.facebook.com/mazyasamvedana                ुुु

No comments: