Friday, August 24, 2012

* आम्ही नक्की कशाचा अभिमान बाlळगायचा *

       *  आम्ही नक्की कशाचा अभिमान बाlळगायचा  *

    आम्ही म्हणजे भारतीय, १२१ कोटींची प्रचंड लोकसंख्या असलेला  आपला  देश, आकाराने सुद्धा अफाट. चालिरीती, बोली , संस्कृती, विचार, कला प्रकार, नैसर्गिक वातावरण या सगळ्यात विविधता असुनही आम्ही एकसंघ आहोत, लोकशाही व्यवस्थेत कालक्रमण सुरू आहे.  वर्षामागुन वर्षे जात आहेत पण सामान्य जनता खरच सुखाने नांदते आहे? या देशाची ८० टक्के जनता सामान्य आहे.  कामगार, मजूर, शेतकरी, छोटे व्यावसाईक अशा विविध गटातील  आहेत आणि यातील  कुणीही सुखी नाहीत.  आनंदी नाहीत.  त्रस्त आहेत वाढत्या महागाईने, रोजच्या छोट्या छोट्या गरजेच्या  वस्तू  मिळवतांना चिंताक्रांत  आहेत , नित्य पसरवल्या जाणाऱ्या  राजकीय विदवेशाने, पावला  गणीक नाडवल्या जाणाऱ्या  भ्रष्टाचाराने सामान्य माणूस त्रस्त आहे.  असुरक्षित आहे नक्षली  हल्ले , दंगे, अत्याचार बाँम्बस्फोट, हलगर्जी  पणाने घडणारे लहानमोठे अपघात, माफीयांचा आतंक, सत्ता आणि पैसा यात आकंठ बुडालेले  नेते, त्यांची सततची बेताल  वक्तव्ये, सगळ्या  समस्या प्रलंबित, त्यात रोज नव्या समस्या, जनता त्रस्त आहे.

    जास्त धोकादायक जर काही असेल  तर ते म्हणजे सामान्य माणसाला  सहन करण्याची, दहशतीत जगण्याची, त्रस्त असण्याची सवय झाली  आहे.  कसला तरी अभिमान वाटावा अस चौफेर काही दिसत नाही सत्तेत असलेले  किंवा सत्तेच्या जवळ  असणारे प्रत्येक विषयात कमाई करताहेत.  शिक्षणाचा पार बाजार झाला . नोकऱ्या  विकावू झाल्यात.  जमीनी पद्धतशीर बiकावल्या जातात.  अवाच्या सव्वा भावाने विकल्या जातात.  त्यासाठी दंगे घडवले  जातात गोळी बार होतो.  आम्ही दहशतीत जगतो.  राजकारण खेळले   जाते, गरीबांच्या प्रेमाचे नाटक खेळले  जाते.  संतत दहशतवादी हल्ले  होतात.  किड्या  मुंग्यासारखे सामान्य लोक रस्त्यात मरून पडतात.  आप्तस्वकीय गमावलेले  धाय मोकलून रडतात, कायमची मोडून जातात.  आपले  कुणी मेलं  नाही म्हणून बाकीचे थोडं सुखावतात.  आणि गप्प राहतात.  काही दिवस धावपळ , कवायत, मेणबत्यांचा मोर्चा, मानवी साखळी , मुंबईकरांची जगण्याच्या स्पिरिट साठी तारीफ आणि पुन्हा दहशतीत रोजच जीवन, पुन्हा राजकारण, बेताल  वक्तव्ये. देशात सर्वोच्च आहे ती संसद, त्या संसदेच्या सार्वभौमत्वावर आतंकी हल्ला   झाला  तरीही आम्ही निषेधाचे खलीते सोपवतोय.  कणखरपणे धडा शिकवू शकत नाही.  याचा आम्ही अभिमान बाळगायचा का?
       नवनवीन आतंकी संघटना नावं बदलवून निर्माण होत आहेत.  विविध मार्गाने आतंकी देशात दाखल  होत असल्याचे सांगितले  जाते.  स्फोटके सहजपणे आणली  जातात, दहशत माजवली  जाते.  काही घडत नाही तोपर्यंत सुरक्षित आहोत असे म्हणायचे. नक्षल  चळवळ  हा दहशतवादच आहे.  अशा राज्यांमध्ये सरकार नेमकं कुणाचं, हाच प्रश्न पडतो.  अभिमान वाटावा असं काहीही दिसत नाही.  जे आधीच गब्बर आहेत तेच शिक्षण सम्राट, उद्योग सम्राट, मिडिया सम्राट बनून साम्राज्याचा उपभोग घेत आहेत.  शिक्षण स्वस्त नाही, औषधोपचार पराकोटीचा महाग, योजना फक्त उरल्या कागदांवर.  शेतकऱ्याची व्यथातर त्यांच्या घरात जन्म घेतल्याशिवाय खरोखर इतरांना समजणारच नाही. मजूर, शेतकरी, अत्याचारग्रस्तांचे मृत्यू हे चित्र अभिमान वाटावा असं नाहीच.  देशातच लपवून ठेवलेली  आणि विदेशात पळवून नेलेली  संपत्ती लाखो करोडोच्या घरात आहे.  अफाट धन संग्रही असणारे बाबा, संत, महाराज तसेच मोजता येणार नाही इतकी संपत्ती दडवून ठेवलेली  मंदीरे.  काय कामाची ही प्रचंड धनराशी जी देशाच्या काहीही उपयोगी नाही.  देशाचं सामर्थ्य  , विकास यांची भलावण आमच्या समोर केली  जाते पण प्रत्येक क्षेत्रात किती गोंधळ  आहे,* नित्य  प्रचंड घोटाळे  उघडकीस येत आहेत.*  धन कमावण्याची इतकी निलाजरी धडपड दिसते आहे की हे सगळ  कुठे जावून थांबणार हेच कळत नाही. ज्यांनी जनतेचे संरक्षण करायचे तेच खुर्ची ,तिजोरी आणि लाठी च्या जोरावर मलिदा कमावताहेत. सगळेच आरोप नाकारले जातात मग अत्यंत कमी काळात हे सगळे अरबो ची दौलत कशी काय मिळवतात हे  कुणी सिद्ध करून यांना शिक्षा देईल का ? खरंच , ' अभिमान वाटावा असं काही आहे?' आम्ही नक्की कशाचा अभिमान बाळगायचा?*
            सुहास सोहोनी .९४०५३४९३५४
            क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
            www.suhassohoni.blogspot.com

No comments: