Friday, August 24, 2012

विकृतीच्या व्हायरसचा फैलाव होतोय

     *      विकृतीच्या व्हायरसचा फैलाव होतोय      *

    अर्वाच्य, अश्लील , गलिच्छ, किळसवाणं, घृणास्पद अशा विशेषणांनी वर्णन करता येतील  असे हिडिस प्रकार नित्य, राजरोस घडताहेत.  कुविचारांनी कुप्रवृत्तीशी फारच जवळिक केली  आणि चोऱ्या  खुन, दरोडे, फसवणूक, बलात्कार, अश्लिल  चित्रफित,  मोबाईल  द्वारे गुन्हे घडताहेत.  एकतर्फी प्रेमात कुणी प्रेयसीला  जाळताहेत, कुणी  ब्लेड मारताहेत, हातपाय तोडताहेत, कुठे सामुहिक अत्याचार घडताहेत.  बाप, बहिण, भाऊ, आई किंवा आजी ही सगiी रक्ताची पवित्र नाती सुद्धा विकृतीला  थोपवू शकत नाहीत.   अशा विकृतांधांची लोकसंख्‌या दिवसंदिवस वाढते आहे.  त्यात भर म्हणून माफियांचे हल्ले , पोलिसांच्या हत्या, पोलिसांच्या तर्फे प्रति कारवाई, दमनचक्र, त्यावेळी  कितीतरी निरपराध जीवांची होरपळ  होते.  दररोज अशा मन सुन्न करणाèया बातम्या ऐकायला , वाचायला  व पहाव्या लागतात.  नराधमांच्‌या अत्याचाराला  प्रत्यक्षात एकदा बळी  पडलेल्या महिलेचा फोटो विस्तृत बातमीसह संपूर्ण देशात घराघरात दूरसंचाद्वारे दाखवला  जातो आणि रोज  तिच्या अब्रूची पार लक्‌तरं होतात. पण गुन्हेगाराच्या तोंडावर मात्र काळा  कपडा टाकला  जातो. असं का होतंय?
     आपल्या देशात फार पुर्वपासून महान लोकोत्तर संत, महात्मे, विचारी पुरूषोत्तम आणि सद्‌विचार रुजविणारे दिव्य पुरूष होवून गेले .  आजही जिथे तिथे शेकडो मंदीरे, मठ, आश्रम आहेत.  तेथे समाजाला  त्याग, सेवा, सहकार, प्रेम, शांती, विनम्रता या सद्‌विचारांची शिकवण दिली  जाते.  काया, वाचा आणि मनाच्या शुद्धीकरीता विविध प्रकार, प्राणायाम व योग साधनेद्वारे मन:शांती प्राप्त करण्याकरीता अगदी करोडो लोकं प्रयत्न करतात. लक्षावधी लोक वारकरी बनून समाजाला  आदर्शाचे धडे घालून देतात.  यात्रा, धर्मस्थळे , तिर्थक्षेत्र अशा ठिकाणी पापक्षालन आणि पुण्यसंचयासाठी नित्य लाखो करोडोंच्या संख्येने लोक-भक्ती मार्गाचा अवलंब करून नतमस्तक होतात.  मग इतकं होवूनही आपल्या देशाचं पुण्य कुठे कमी पडतं, की महापापी विकृतांध जन्माला  यावेत?
    षड्‌रिपूंनी थैमान घातलेल्या या भरकटले ल्या जीवांच्या मनावर कधीही नष्ट  न होणाऱ्या  पंचशील  तत्वांच्या मिश्रणाची फवारणी व्हावयास हवी.  अनेक जिवाणू, विषाणू, व्हायरस मानवाला  त्रस्त करीत असतात. अगदी तसाच हा विकृती नावाचा व्हायरस हळू  हळू  मानवी मनात बलवान होतोय आणि फैलावतोय.  आपले  वाचन, मनन, चिंतन, कपडे, फेशन, करमणूकीची माध्यमे, सवई, व्यसने, आपले
 आदर्श अशा अनेक विषयात आपले  काही चुकते आहे का? या विषयी सतर्क राहुन आत्मचिंतन व्हावे.  फोफावणाऱ्या  या विकृती नावाच्या व्हायरस चा नायनाट लवकरच करावयास हवा. आणि हे काम आपल्याला स्वतःलाच करावे लागणार .
                            
                                 सुहास सोहोनी ९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                                 www.suhassohoni.blogspot.com





No comments: