Tuesday, August 21, 2012

समाजातील त्रिदोषामुळे वाढतयं कुपोषण

            *    समाजातील  त्रिदोषामुळे  वाढतयं कुपोषण   *
-------------------------------------------------------------------
                       नदीचं मुळ  आणि ऋषीचं कुळ शोधणे महाकठीण काम असल  तरी सध्या वर्षानुवर्षे गाजत असलेल्या कुपोषणाचं मुळ  कारण म्हणजे खुप अंधश्रद्धा, बेरोजगारी, अज्ञान आणि कुटूंबनियोजन योजनेचा बट्ट्याबोळ , हेच आहे.  मध्यम वर्गीयांना  आपल्या एक किंवा दुसऱ्या  मुलाचं भवितव्य सुरक्षित करतांना प्रचंड कसरत करावी लागते, तिथे पाच, सहा मुलां पेक्षा जास्त अपत्ये  असणाऱ्या  दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या ,  फारसा रोजगार उपलब्ध नसलेल्या, गरीब कुटूंबामध्ये कुपोषित बालके आढळणे स्वाभाविक आहे.  दररोजच्या रोजगार मिळण्याच्या चिंतेत असणाऱ्या  कुटूंबाला , आपल्या, इतक्या जास्त प्रमाणात असलेल्या अपत्या कडे लक्ष दयायला , संगोपन करावयाला  वेळ , पैसा असेल  ?
                गडचिरोली  व मेळघाट सारख्या रमणिय परिसरात निसर्गाने जरी भरभरून दान दिले  असले  तरी अंधश्रद्धेच्या जिवघेण्या दलदलीत तिथले  जिवन फसलेल  आहे.  ज्ञानाच्या अभावामुळे  अंधश्रद्धेच्या जाळ्यात माणसाचा मेंदू बधीर झाला  आहे.  त्यासोबत अस्वच्छता, जिवाणूचा संसर्ग अशी अनेक महत्वाची कारणें कुपोषणाला  मदत करीत आहेत.  अज्ञानी आणि कुपोषीत मातेच्या पोटी जन्म घेणारं बाळ  जन्मत: कुपोषित असण्याची शक्यता जास्त आहे.  जन्मानंतर जीवन जगण्यासाठी त्या बाळाला  हवा आहे  पौष्टिक आहार, स्वच्छ संसर्ग विरहीत निवास, योग्य औषध उपाय योजना , पण सर्वात महत्वाचे म्हणजे नित्यनियमीत लक्ष देणारी, बाळाला  मायेची उब देवून संरक्षण देणारी ज्ञानी माता.  बेरोजगाराच्या झंझावातात सापडलेल्या कुटूंबातील  या मातेला  बाळा च्या संवधर्नासाठी, प्रेम देण्यासाठी निश्चींत असा वेळ  आहे ? प्रसुती पुर्व काळात योग्य औषधी किंवा अन्नाद्वारे जीवनसत्वे व उष्‌मांक मातेला  न मिळाल्यामुळे  त्या बाळाचे निट पोषण होत नाही व जन्मत:च बाळाचे वजन कमी असल्यामुळे  कुपोषणाचा धोका वाढतो.  जन्मानंतर बाळाच्या संगोपनात अक्षम्य हेळसांड झाल्यामुळे  टप्याटप्‌प्याने कुपोषणाचे गांभीर्य वाढते.  प्रतिकार शक्‌ती क्षीण झाल्याने ऋतूमानातील  छोटे बदल  ते बाळ  सहन करू शकत नाही व रोगग्रस्त राहते.
                अफाट जनसमुह असलेल्या या भारत देशात आदीवासी बहुल  प्रांतात एक मोठा समाज घटक कुपोषणाच्या समस्येत त्रस्त आहे.  कुटूंब नियोजन या विषयात उदासीन असलेले  हे आमचे भाईबंद बेरोजगारीच्या वणव्यात खरपूस भाजले  जात असतांनाच कधी कोरडा दुष्‌काळ , नापीकी आणि कर्जाचे ओझे घेवून वाकले  आहेत, तर कधी ओला  दुष्काळ , महापूर यासारख्या प्रलयंकारी वादळात सापडून त्यांचं सर्वस्व हेलकावे खात पाचोळ्या सारखं उडून जात आहे.  निसर्गाच्या लहरीपणाला  कंटाळुन एक मोठा समाजघटक हजारो हेक्टर जमीन पडीक ठेवायला  तयार आहे.  समाजमनाच्या असंतुलीत  मानसीक दवंद्वाचा अर्थ कळतोय का ?  अंधश्रद्धेच्या जबरी मिठीत अडकलेला  हा समाजघटक ज्ञानाच्या प्रकाशकिरणांची वाट शोधतो आहे.  रोगावर किंवा जखमांवर केवळ  फुंकर घालून किंवा वरवर मलमपट्या  लावून किती काळ  आम्ही पक्षीय राजकारण साधणार आहोत ? खरी गरज आहे ती अंधश्रद्धा, बेरोजगारी आणि लोकसंख्या वाढ या त्रिदोषाला  समुळ  उखडून फेकण्याची. गरज आहे अशा धन्वंतरीची.

        सुहास  सोहोनी -9405349354    
      वर्तुळाचे  टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
       www.suhassohoni.blogspot.com

No comments: