Thursday, August 23, 2012

प्रार्थना - एक संस्कार

           *   प्रार्थना - एक संस्कार      *
   
             मानवी मनाची जडणघडण हजारो वर्षाच्‌या संस्काराने होत असते.  हे संस्कार रक्‌तात भिनलेले  असतात. अनेक चांगल्या वाईट संस्कारांपैकी प्रार्थना हा एक संस्कार आहे. श्रद्धा आणि भक्तीयुक्त प्रार्थनेने कार्य सिद्धी होते हा विश्वास, हा सुद्धा संस्काराचाच भाग आहे. प्रार्थनेने मन शांत होते, सुविचार मनात येतात, आत्मविश्वास वाढतो. वातावरण प्रसन्न-चेतनामय होते. दु:खी-कष्टी  जीवाला  प्रार्थनेने दिलासा मिळतो.सामूहिक प्रार्थनेने एकी वाढते. माणसाच्या प्रगतीस  उपकारक असणाऱ्या  तसेच शक्तीमान तत्वांची  आपसूकच प्रार्थना केली जाते. त्यातून त्या शक्तीची श्रेष्ठता   स्वीकृत केली जाते.
           ही संपूर्ण सृष्टी ज्यापासून उत्पन्न झाली त्या पंचमहाभूतांपेक्षा म्हणजेच निसर्गापेक्षा सर्वशक्तीमान असे दुसरे काहीही नाही, आणि मानव म्हणजे या संपूर्ण ब्राम्हंडा मधील पृथ्वी नामक ग्रहावरील केवळ  एक जीव. निसर्ग तत्वांचा  सखोल अभ्यास करून जोपासलेलं विज्ञान हे मानवाच्या बुद्धीचे प्रमाण आहे.त्या आधारावर त्याने अनेक आवश्यक-अनावश्यक सुखसोयी उपलब्‌ध करून घेतल्या, परंतू केवळ  एवढ्यावरून निसर्गाच्या श्रेष्ठत्वाला आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि निसर्गाची प्रार्थना करणे यात काहीच गैर नाही. केवळ  स्वार्थासाठी सत्ता हातात असलेल्या व्यक्तिची प्रार्थना-पूजा होत असलेली आपल्याला नेहमीच दिसते, त्यापेक्षा सर्वचराचराच्या भल्यासाठी निसर्गदेवतेची केलेली प्रार्थना नक्कीच चांगली. पण त्यासोबत योग्य कर्म आवश्यक आहे.
    थोडं बारकाईने आजुबाजूला लक्ष दिले तर असे दिसेल की पूर्वापार सुसंस्काराचा झपाट्याने लोप होत चालला आहे. चांगले विचार, उच्च  नितिमत्ता या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्‌या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून  अनाचार,अत्याचार व्यसनाधीनता, स्वार्थाचा अतिरेक आणि स्वत:च्या नेमून दिलेल्या कर्तुत्वातील बेजबाबदारपणा फारच वाढला आहे. या दुर्दैवी  पाश्र्वभूमीवर प्रत्येक व्यक्तिने मनावर संयम ठेवण्यासाठी, एकाग्रता वाढीसाठी, आत्मविश्वासासाठी, सूविचारासाठी दररोज या श्रेð निसर्गदेवतेची, पंचमहाभूतांची प्रार्थना करणे तसेच निसर्गाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. प्रार्थनेत प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत फक्त एवढेच म्हणावे.
।। हे निसर्गदेवते मला सुबुद्धी दे।।
               सुहास  सोहोनी ९४०५३४९३५४
          उजळते  क्षितीज [मराठी लेखसंग्रह २००७]
           www.suhassohoni.blogspot.com







No comments: