Thursday, August 23, 2012

मधुमेह म्हणजेच खुले रंगमंच

                        *   मधुमेह म्हणजेच खुले  रंगमंच    *
                                [जागतिक मधुमेह दिन ]

    अपघात झाल्यानंतर रक्तात साखर जास्त आहे ह्या  कारणाने ओपरेशनला  वेळ लागतो आणि आपण मधुमेहाचे रोगी आहोत याचं ज्ञान होतं.  हे स्वास्थ्याबाबतचं अज्ञान बरं नव्हे.  आपल्या रक्तामध्ये विविध घटकांचं प्रमाण निश्चित अशा स्वरूपांत असतं.  त्यात साखर हा सुद्धा एक अतिमहत्वाचा घटक आहे.  जे काही अन्न आपण खातो त्यातील  साखर (ग्लूकोज) रक्तात मिसळली  जाते आणि शरिरातच निर्माण होणाऱ्या  इन्सुलिन नामक द्रव पदार्थाद्वारे रक्‌तातील  साखर  नियंत्रीत केली  जाते.  अनेक कारणांनी शरीरात इन्सुलिन तयार होण्यास बाधा आली  तर सहाजीकच साखर अनियंत्रीत होणार व ती व्यक्ती मधुमेही म्हणून घोषीत होणार.  तेव्हा मधुमेह असणे म्हणजे रक्तातील  साखरेची बिघडलेली  स्थिती.  उत्तम आरोग्य आणि संतुलीत शुद्ध रक्त यांचा फार जवळचा संबंध आहे.
    ज्या प्रमाणे रंगमंचावर विविध नट, नट्या  सहजतेने प्रवेश करतात, आपल्या अस्तित्वाने, प्रभावाने वातावरण निर्मिती करतात, तसे मधुमेही असलेलं   शरीर म्हणजे जणू काही एक रंगमंच असतो, पण हा रंगमंच विविध विषाणू, जिवाणू, रोग विकार यांना आग्रही निमंत्रण देतो आणि शरीरात या विकारांना जागा करून देतो.  हे सगळे  निमंत्रित कलाकार सहाजिकच खलनायकी वर्गातले  असतात आणि खलनायकी प्रवृत्तीनुसार रंगमंचावर प्रभाव पाडून अनारोग्याची वातावरण निर्मिती करतात.  मुख्य म्हणजे एकदा शरीररूपी रंगमंचावर प्रवेश करून जागा मिळवली  की कायमस्वरूपी घर करण्याकडे या खलनायकांची वृत्ती असते.  अनारोग्याने ढासळणारं शरीर म्हणजे खलनायकी पात्रांचा विजय, अशी ही दृष्य परिस्थिती दिसू लागते.
    कोणतेही विकार म्हणजे अनेक वर्षांची हळु हळू  सुरू राहणारी प्रक्रिया असते.  रुग्णाला  त्याची जाणीव नसते.  बालपणातील  विविध समस्या, वातावरण, कुपोषण, पुढे आयुष्यभर असलेला  ताणतणाव, चिंता, तिव्र स्पर्धा, सगळ्याच गोष्टीतील  अनियमितता, व्यसने, खाण्यातील  अतिरेक तसेच व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी हळू  हळू  स्वास्थ्यसंतुलन बिघडण्यास मदतच होते. शेवटी शरीरात इन्सुलिन निर्माण प्रक्रिया मंदावते म्हणून रक्तात साखर साठते, वाढते.  ही इन्सुलीन निर्माण यंत्रणा जी आपल्या शरीरात आहे तिच्यावर आपल्या अनियंत्रित आहार विहार आणि व्यायामाचा परिणाम होतो आणि म्हणून मधुमेह होण्याची शक्यता वाढते.  याचा अर्थ असा की नियंत्रित आहार, विहार आणि नियमीत व्यायामाने रक्‌तातील  साखर नियंत्रित करता येते.  दैनंदिन वागण्यातील  नियमितपणा आणि त्यादवारे होणारं नियंत्रण या  सर्व गोष्टी  खरंतर आपल्याच हातात आहेत.  यासाठी आपल्या रक्तातील  साखरेची स्थिती आणि त्यामुळे  होणारे दुष्परिणाम याचं यथायोग्य ज्ञान असणं ही एक आरोग्यविषयक गरज आहे.  दिवसेंदिवस  रोगसंक्रमणाची तिव्रता वाढते आहे.  विज्ञानामुळे  नव्या जीवनशैली च्या स्विकारण्यामुळे  काही नवे आजार, व्याधी मुऴ   धरताहेत.  प्रदुषण, अती चरबीयुक्त पदार्थ, अती तेल , तुप, साखर यांचा वापर याव्यतिरीक्त व्यायामाचा अभाव अशा विविध कारणांनी आरोग्य संतुलन बिघडते आणि एकदा का रक्तात साखर साचण्याची स्थिती निर्माण झाली  की नाजूक अवयवांवर लवकर हल्ला  होतो.  प्रतिकार शक्ती कमी होवून कोणताही ऋतुमानातील  आजार चटकन होण्याची शक्यता वाढते.
    उत्तम आरोग्यासाठी आपल्या शरीराचं ज्ञान आपल्याला  असणं अतिशय महत्वाचं आहे.  चाळीशीनंतरची तपासणी व उपाययोजना स्वत:करीता व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  सर्वांकरीता  फारच महत्वाची आहे.  चाळीशी हा आयुष्यातील  महत्वाचा टप्पा असल्यामुळे  नेमकी हीच वेळ  स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचीही असते.  काळजी करणे म्हणजे घाबरणे नसून एखादा रोग मुळात होऊच नये यासाठी सज्ज असणे, काळजी घेणे केव्हाही योग्य.  बरेचसे विकार प्रथमावस्थेत उपाय योजना, सवईत बदल  करून खात्रीने रोखता येतात.  अनेक समस्यांवर आपण स्वत:च नियंत्रण ठेवू शकतो.
                सुहास  सोहोनी    ९४०५३४९३५४
               क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                www.suhassohoni.blogspot.com                       




No comments: