* असंतुष्ट आणि
भ्रष्टाचार्यांच्या शोधात असतात आतंकवादी *
इतिहास साक्ष आहे कि जेंव्हा जेंव्हा
सकारात्मक विचार करणारे सज्जन असंघटीत होऊन निस्तेज,निराश होतात,तेंव्हा दुष्ट
प्रवृत्ती सोकावतात ,अत्याचारी प्रबळ होतात आणि निरपराध समाजाची दुर्दशा होते .आतंकवादी
घटनांमुळे देशाच्या शांतता व विकास प्रक्रियेस खिळ बसते .समाजमन विदीर्ण होते
,प्रक्षुब्ध होते .नेमकी त्याचवेळी राजकारणाची खेळी रंगते,आरोप प्रत्यारोपाची
जुगलबंदी सुरु होते .विविध वृत्त वाहिन्या अत्यंत तत्परतेने देशवासियांना माहितीचा
ओघ पुरवतात.काही चेनल्स तर संबंधित घटनेला जबाबदार आतंकवाद्यांची नावे,पत्ता,फोटो
सुद्धा दाखवून देशाच्या पोलीस यंत्रणेपेक्षा सरस असल्याचे पटवून देतात .फक्त हे
गुन्हेगार सापडत नसतात कारण हे भारताच्या सीमेपलीकडून आलेले असतात आणि घटनेला
‘अंजाम’ देऊन परत सीमेपार गेले असावेत – बहुतेक ----
देशांतर्गत समस्या पुढे करून अनेक
उपद्रवी संघटना विविध ठिकाणी हिंसक कारवाया करून दहशत निर्माण करतात ,ही एक तीव्र
डोकेदुखी असतांनाच आंतरराष्ट्रीय आतंकवादाचे प्रमाण भारतात फार वाढलं आहे
.सीमेपलीकडे असलेली आतंकवादी संघटनेची प्रशिक्षण केंद्रे ,त्यांना मदत करणारी
सरकारे यांचा उल्लेख आणि निषेध करूनच आमचं सरकार थांबत .सुसज्ज सैन्य असतांना
आतंकवादी असे कसे येऊ शकतात,देशभर निर्धोक संचार कसा करू शकतात ?यांना भाड्याने
घरे कशी मिळतात ?हवं तेव्हा व हवा तितका काळ ते इथे राहू कसे शकतात ?कोण नेहमी
यांना मदत करत ?अफाट शस्त्रसाठा ,स्फोटके नित्य नेमाने कशी आणली जातात ?यांना
भारताची प्रगती आणि शांतता बघवत नाही .आतंकवादी व्यक्ती भारतात असतांना त्यांना कळत
नकळत मदत करणारे भ्रष्टाचारी भारतीय नागरिकाच आहेत ,तर मग काय स्वार्थ आहे या
नागरिकांचा ?यांच्या मुळे देशाची कधीही न भरून निघणारी हानी होते हे कधी कळणार
आमच्या भ्रष्टाचारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी
कारवायांना समर्थन देणाऱ्या असंतुष्ट नेते ,सेलिब्रिटी व असंतुष्ट समाजघटकांना ? या
नतद्रष्ट लोकांमुळे भारतीय संरक्षण यंत्रणा आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आपल्या
‘ लक्ष्यापर्यंत ‘ हे हल्लेखोर पोहचतात, तोपर्यंत अख्खा देश झोपलेला असतो का?
सीमेच्या आत देश रक्षणासाठी ‘दक्षता
पथक’/[,’देशप्रेमी प्रहरी’] तयार करण्याची गरज आहे .विविध तपास यंत्रणा व पोलीस
यांच्या सोबत जबाबदारीने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मोठ्या आर्थिक
व्यवहारांवर करडी नजर हवी .आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या ,समर्थन देणाऱ्या छुप्या
आश्रयदात्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावयास हवी ,ती सुद्धा लवकर .आपल्याकडे
न्यायालयाचे निकाल विलंबाने लागतात .अतिरेकी मात्र भरमसाठ पैसा पेरून हवे ते
मिळवतात, हे थांबायला हवे .अद्ययावत गुप्तचर यंत्रणा व दक्ष नागरिकांच्या
सहाय्याने प्रत्येक कट उध्वस्त करता यायला
हवा. अतिरेकी कारवाया म्हणजे अघोषित युद्धच समजायला हवे.राजकारण्या सकट कुणीही
वेगवेगळी विधाने करून केवळ अंदाज जाहीर करू नये किंवा परिस्थिती व घटनेचे समर्थन
करू नये .आपल्या देशात परस्पर विरोधी राजकीय,मानसिक व वैचारिक असे टोकाचे मतभेद
आहेत.अयोग्य बेताल वक्तव्ये केली जातात ज्यामुळे जनतेत वैचारिक मतभेद होऊन लोकं
हिंसक होतात.आतंकवाद्यांचे आयतेच फावते .प्रत्यक्ष युद्ध करण्याची ताकत नसलेले,आतंक
वादाच्या भ्याड हल्ल्याच्या मार्गाने त्रास देणारा दुश्मन जास्त धोकादायक असतो . व्यसने आणि भ्रष्टाचाराचे बीज रोऊन दहशतवादी
भारताला खिळखिळे करू इच्छितात तेंव्हा भारतीयांनी संघटित होऊन सुरक्षेला अग्रक्रम
देणे आवश्यक आहे .सर्व भेदाभेद विसरून प्रत्येक भारतीयाने दहशतवादी विचार
संपवण्यासाठी संघटित होऊन सतर्क राहणे जरुरी आहे , आणि *फक्त विरोधासाठी विरोध
करणे थांबवावे*
सुहास सोहोनी
लेख संग्रह [घे उंच भरारी
२०१६]
www.suhassohoni.blogspot.com
No comments:
Post a Comment