*नेतृत्वहीन व दिशाहीन
जनसमुदाय *
कुठल्याही कारणांनी आपला रोष प्रगत
करतांना जेंव्हा जमाव रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्या जमावाला चेहरा नसतो .परिणामाची
पर्वा नसते .त्यात जर नेतृत्व नसेल तर सैरावैरा लोंढ्यासारखा उसळणारा जमाव म्हणजे
जणू काही फुटलेल्या धरणातून रोरावत निघालेले पाणीच .कधीही ,काहीही घडू शकते .आपल्या
दैवतांवर अतीव भक्ती असणारा हा दुखावलेला समूह नेतृत्वाची वाट पाहत थांबत
नसतो.स्वयंस्फुर्तीने निषेध नोंदविण्यास रस्त्यावर उतरलेला असतो ,आणि म्हणूनच
दिशाहीन बनण्याची फार जास्त शक्यता असते .असा हा समूह उग्र क्रूर आणि हिंसक बनला
तर नवल नाही .सत्ताधारी व प्रस्थापिता विरुध्ध गरळ ओकत आडव्या येणाऱ्या कोणाच्याही
संपत्तीची सहज राख रांगोळी करतो जीव हानी ,वित्तहानी होते .विकास थांबतो पण भान
संपलेले असते ,मग सुरु होतो हिंसाचार .
असं का होते ? ही माणसे हिंसा का करतात
?ही क्रांती नसते आणि युध्द तर नसतेच किंवा सशस्त्र बंड ही नसते .निषेध व्यक्त
करणे गरजेच असले तरी देशाच्या प्रगतीला खिळ घालणे व स्वतःच्या साधन संपत्तीचा नाश
करणे हे योग्य नाही.गरिबीने होरपळलेली उपेक्षित ठेवलेली लाखो करोडो डोकी संताप
ग्रस्त होत आहेत ,प्रक्षोभित होऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा करताहेत म्हणजेच अजून
भेदभावाची प्रचंड दरी आहे, समानता नाही, परिपक्वता नाही ,मुळात ऐक्य नाही
,प्रत्येक जण माझं, आमच, वेगळेपण प्रकर्षाने सांभाळतो आहे .कसे होईल भारतीय
ऐक्याचे ?
शिक्षण झालेले बरेच तरुण स्पर्धेत
मागे पडतात ,बेरोजगारीने त्रस्त आहेत इच्छा आकांक्षा वाढल्या आहेत पण त्या पूर्ण
होत नाहीत त्यात व्यसने लागलेली. मार्ग दाखवायला जबाबदार नेता नाही .”रिकाम्या
मनात सैतानाचा संचार असतो “हे सत्य आहे .कुणीही यावं ,जनसमुदायाला भडकावणार भाषण
करावे ,टाळ्या मिळवाव्या आणि दिशाहीन डोकी होरपळण्या साठी झोकून द्यावी .हे
थांबायला हवं. प्रत्येक समाज घटकांत देशहित संभाळणार नेतृत्व हवं .कुठेही अनुचित
घटना घडू नये ,हिंसा ,नुकसान होऊ नये या गोष्टी कौशल्याने हाताळणाऱ्या नेत्याची
गरज आहे .जमा झालेला अफाट जनसमुदाय एखादे सकारात्मक कार्य करू शकेल .यांना
भ्रष्टाचाराचा ,समाज कंटकाचा राग यायला हवा .सकारात्मक विचार बिम्बवणारे आई बाप
व शिक्षकांनी मुलांना सन्मान व देशहित
जोपासायला शिकवायला हवे .हिंसक घटनांमुळे आपण अनेक वर्षे मागे जातो याचे भान हवे
.हिंसेने फक्त प्रतीहिंसा आणि युगायुगांचा द्वेष जोपासला जातो मात्र आपसातील
विश्वास आणि प्रेमभाव कायम सुख –समृद्धी प्रदान करतो .
सुहास सोहोनी ,
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती
४४४६०६ ,फोन २५६७४६३ ,मोब.९४०५३४९३५४ facebook.com /mazyasamvedana
No comments:
Post a Comment