Sunday, March 13, 2016

**गरीब शेती उद्योजकांचा आक्रोश वेळीच ओळखा **



               **गरीब शेतीउद्योजकांचा आक्रोश वेळीच ओळखा**
            देशात नेहमी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या नावावर काय काय केले जाते हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे .केंद्र आणि राज्या मार्फत करोडो रुपयांच्या ”पेकेजेस“ची घोषणा होते ,त्याआधी काहीतरी नाट्यमय वातावरण निर्मिती होते, राजकीय रंग उधळले जातात , काही नेते प्रसिद्धीच्या झोतात येतात ,जनतेला वेठीस धरले जाते --------पुढे काय ? प्रत्यक्ष मदत किती ? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न कायम निकालात का निघत नाही ?
            ढोबळ मानाने ३ प्रकारचे शेतकरी आहेत १] पंचतारांकित शेती असलेले, हे नेहमी सत्तेत किंवा सत्तेच्या जवळ असतात . यांना सगळे लाभ ,सोई सवलती घरपोच आणून दिल्या जातात . हे कधीच आत्महत्या करीत नाहीत.२] शेतीसोबत चांगली नोकरी करणारे .नोकरीवर यांचे घर छान चालते व वाडवडिलांची शेती,हे बऱ्यापैकी करतात.नुकसान सहन करतात ,धन सांभाळून असतात .चढ्या भावाने थोडी शेती विकून हे शहरात आरामात राहतात ,मुलांना नोकऱ्या/व्ययसाय लाऊन देतात. शेतीमुळे यांच्यावर आत्महत्येची वेळ कधीच येत नाही .३] फक्त शेतीवरच उपजीविका करणारे दोन एकर ते पंधरा एकर शेती असलेले ,गरीब शेतकरी ,कर्जाच्या चक्रात अडकलेले ,निसर्गाचा कोप सहन करणारे ,मानवी डावपेच ,भूल- थापांना सहज बळी पडणारे हे शेतकरी देशभर आत्महत्या करतात .यांचे संसार ,परंपरा ,कार्यप्रसंग ,कर्जफेड अशा प्रत्येकच गोष्टीत हा वर्ग अपयशी ठरतो .त्यात प्रलोभान,जुगार,व्यसने या घातक सवयींच्या आहारी जाऊन आत्महत्येची पळवाट शोधतो आणि कुटुंबाची वाताहत होते .
             आजच्या शेती उद्योगाचे भविष्य कसे असणार आहे ?प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक शेती मालाच्या हमी भावाचा प्रश्न का पेटतो ?अवैध सावकारी नक्की कधी बंद होणार ? शेतीला पाणी ,वीज, बियाण, कर्ज उपलब्धी, कर्जफेड या प्रत्येक बाबतीत समस्या एकमेकात गुंतत चालल्या आहेत, त्यातच बोगस खते, नकली बियाणे ,दुबार पेरणी ,मजुरांची कमतरता ,महागाई याबाबत एकत्रित चिंता वाढल्या आहेत .योग्य भाव न मिळाल्यास वर्ष कसं काय निभवायचं ?भविष्यात हे सगळे प्रश्न थैमान घालणार आहेत, हे भाकीत सांगण्यास कुणा ज्योतिष्याची गरज नाही .या धोक्याच्या पातळीवरील व खालील सर्व शेती उद्योजकांनी एकत्रित होण्याची गरज आहे .*सहकार तत्वावर शेतमालाच्या विक्रीचे प्रयोग यशस्वी व्हावेत* .थेट ग्राहकांना माल विकता येईल अशी जागोजागी व्यवस्था हवी .मुख्य म्हणजे एकमेकाला सांभाळून घ्यायला हवे .समुपदेशनाची व्यवस्था हवी .जगण्याची उमद वाढवण्यासाठी संपूर्ण समाजाचे प्रयत्न हवेत .धोक्याच्या रेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांनी सामाजासमोर आपले मन मोकळे करण्याची गरज आहे .गरीब शेती उद्योजकाचा आक्रोश वेळीच ओळखण्याची आवश्यकता आहे .
              सुहास सोहोनी ९४०५३४९३५४ ,www.suhassohoni.blogspot.com

No comments: